मार्केट पोलिसांची कारवाई : 57 हजार रुपये जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
विरभद्रनगर येथे जुगार खेळणाऱया चौघा जणांना मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी छापा टाकताच एक जण फरारी झाला आहे. या कारवाईत 57 हजार 160 रुपये जप्त करण्यात आले आहेत.
मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या सहकाऱयांनी रविवारी रात्री 11.15 वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी सुरु असलेल्या अंदर-बाहर जुगारी अड्डय़ावर छापा टाकून ही कारवाई केली आहे.
अब्दुलखादर अकबरअली तारिहाळकर (रा. काकतीवेस रोड), समीरखान मेहबुबखान पठाण (रा. आसदखान सोसायटी), शफी मोहम्मदरसुल हलकर्णी (रा. चांदू गल्ली), वासीम मेहबुबखान चांदवाले (रा. काकतीवेस रोड) अशी अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची नावे आहेत.
पोलिसांनी छापा टाकताच काकतीवेस रोडवरील परशराम हा फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या संबंधी रविवारी मध्यरात्री मार्केट पोलीस स्थानकात कर्नाटक पोलीस कायदा 87 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मार्केट पोलीस पुढील तपास करीत आहेत.









