अध्याय चौदावा
भगवंतांच्या दृष्टीने भक्तांमध्ये जातीभेद नाही, उच्चनीच भाव नाही ते उद्धवाला म्हणाले, भक्तीचा खरा महिमा सांगायचा झाला तर, लोकव्यवहारातील दांभिक प्रति÷ा सोडून शुद्ध भावार्थाने जो माझ्या भजनी लागला, तो जातीने हीन असला, तरी तो मला अत्यंत पूज्य आहे. म्हणून परमार्थात भाव हाच मुख्य आहे. जातीचा अभिमान काही उपयोगी पडत नाही. माझी प्राप्ती व्हावयाला भक्ती हीच श्रे÷ आहे. कोणी कोणत्याही जातीत जन्मलेला असो. ज्याच्या हातून माझी भावपूर्वक भक्ती घडते, तोच पवित्रतेची मूर्ती होय असे समज. माझ्या भजनानेच माझी प्राप्ती होते यात काहीच संशय नाही. माझी भक्ती सोडून अनेक साधने किंवा वादविवाद केले असता माझी प्राप्ती होत नाही. माझ्या प्राप्तीसाठी जे काही प्रयत्न होतात त्याला भक्तीचे अधि÷ान असावेच लागते. माझ्या भक्तीशिवाय सत्य भाषण करणे हेही जन्मांधाप्रमाणेच समजावे, कारण त्यात पदोपदी प्रमादच होत असतात आणि आपण अधःपतनाला जात आहोत हे होणारे नुकसानही तो पाहात नाही.
माझ्या भक्तीशिवाय जी विद्या, ती केवळ अविद्या समज. ज्याप्रमाणे कावळा चंद्राला ओळखत नाही, त्याप्रमाणे ते माझ्या आत्मबोधाला ओळखत नाहीत. पाठीवर लादलेल्या चंदनाचे ओझे गाढव वाहत असते, पण त्या चंदनाच्या सुवासातील रहस्य काही तो जाणत नाही. त्याप्रमाणे माझ्या भक्तीशिवाय विद्या आणि शास्त्र पढणे म्हणजे गाढवाप्रमाणे केवळ भारवाहक होणेच होय. माझ्या भक्तीशिवाय शरीरशोषणादिक जे मोठे तप मनुष्य करतो, तो जणू काय पूर्वसंचितानुसार ते पापच भोगतो असे समजावे. माझ्या भक्तीशिवाय जे जे साधन करावे, ते ते आपल्यासभोवती कोश करून त्यात राहणाऱया किल्याप्रमाणे समजावे. कारण भक्तीशिवाय जी क्रिया करावी, ती आपली आपणासच बंधनकारक होते. तात्पर्य, माझ्या भक्तीशिवाय जे काय केले असेल ते सर्व अप्रमाण होय. आता त्याच भक्तीचे शुद्ध स्वरूप सांगतो. माझ्या भक्तीने जोपर्यंत शरीर पुलकित होत नाही, चित्त द्रवत नाही, आनंदाश्रू वाहात नाहीत, तोपर्यंत अंतःकरण पूर्ण शुद्ध होत नाही. आवडीने हरीची कथा श्रवण केली असता, किंवा नानाप्रकारची चरित्रे ऐकली असता, किंवा माझ्या स्वरूपाचाच ऊहापोह निरंतर हृदयात होत असताना, चित्तात पालट होतो आणि माझी भक्ती उत्पन्न होते. माझ्या भजनाच्या अत्यंत प्रेमाने मोठय़ा आवडीने माझी नामे गातात, मोठय़ा भक्तीभावाने रंगून जाऊन नाचतात. अंतःकरणांतून प्रेमाची उसळी आल्यामुळे भर सभेत रंगांत येऊन गातात आणि नाचतात, त्यामुळे मनात जो भक्तीप्रेमाचा पाझर फुटतो, तो बाहेर व्यक्त होणाऱया स्थितीवरून स्पष्ट दिसतो. अंतःकरणात सुख उत्पन्न झाले की, बाहेर रोमांच उभे राहतात. त्या आत्मानुभवसुखाची गोडी डोळय़ातून प्रेमाश्रुच्या रूपाने प्रत्यक्ष वाहू लागते. माझ्या भक्तीच्या आवडीने ‘अहं’ आणि ‘सोहं’ ह्या दोन्ही दुव्यांनी अभिमानाची बेडी सुटते आणि विषयाची गोडी नाहीशी होते. त्या वेळी दोन्ही नेत्र विस्तृत होऊन त्यातील तेज चमकू लागते आणि ते सदासर्वदा सुप्रसन्न दिसतात. देहाचे भान स्फुरेनासे होते आणि मन भगवंताच्या ठिकाणी रंगून जाते.
अशी जर माझी भक्ती उत्पन्न न होईल, तर विषयाची विरक्ती कशी होणार ? आणि विरक्ती उत्पन्न झाल्याशिवाय माझी प्राप्ती होत नाही. उद्धवा माझी भक्ती आणि विषय एकाचवेळी मनात राहू शकत नाहीत. माझी शुद्ध भक्ती खरोखरच पूर्णपणे ज्याच्या हाती आली, त्याच्या लक्षणांचे वर्णन आणि त्याची पवित्रता ऐक. जो माझ्या भक्तीला लागतो, तो तत्काळ पवित्र होतो. इतकेच नव्हे, तर त्याने त्रैलोक्मयही पावन केले. पुढे श्रीकृष्ण गर्जना करून म्हणाले, ज्याची वाणी भक्तीने सद्गदित होते, चित्त द्रवते, जो वियोगाने कधी रडतो तर कधी भेटीने हसतो, लाज सोडून कधी उच्चस्वरात गातो तर कधी नाचतो, असा माझा भक्त सर्व जगाला पवित्र करतो.
क्रमशः







