वृत्तसंस्था/ लॉस एंजेल्स
28 जूनपासून लंडनमध्ये सुरू होणाऱया विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतून जपानची महिला टेनिसपटू नाओमी ओसाकाने माघार घेतली आहे. जुलै महिन्यात होणाऱया टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी ओसाकाने विम्बल्डन स्पर्धेतून माघार घेतल्याची माहिती ओसाकाच्या प्रतिनिधीने दिली आहे.
महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत जपानची ओसाका सध्या दुसऱया स्थानावर आहे. पॅरीसमध्ये नुकत्याच झालेल्या प्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतून ओसाकाने माघार घेतली होती. 2017 साली झालेल्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत ओसाकाचे आव्हान तिसऱया फेरीत समाप्त झाले होते. 2018 साली तसेच 2019 साली विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत ओसाकाला पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा रद्द करण्यात आली होती. 28 जूनपासून लंडनमध्ये सुरू होणाऱया विम्बल्डन स्पर्धेत स्पेनचा माजी टॉप सिडेड राफेल नदालनेही पुरुष विभागातून माघार घेतली आहे. नदालने यापूर्वी दोनवेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकली होती.









