काबुल \ ऑनलाईन टीम
अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी ओमानमध्ये आहेत. तालिबानने राजधानी काबुल ताब्यात घेतल्यानंतर घनी एका खासगी विमानाने ताजिकिस्तानला रवाना झाले. पण त्यांच्या विमानाला तिथे उतरण्याची परवानगी नव्हती, त्यानंतर ते ओमानला रवाना झाले. सध्या, घनी ओमानमध्ये असून येथूनच अमेरिकेला जात असल्याची चर्चा आहे. अशरफ घनी यांच्या व्यतिरिक्त, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोहिब देखील ओमानमध्ये उपस्थित आहेत.
२० वर्षांच्या लढाईनंतर अखेर तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. देशात हिंसाचाराला सामोरे जावं लागू नये म्हणून अनेकांनी देश सोडला आहे. दरम्यान राष्ट्रपती अशरफ घनी देखील देश सोडून पळून गेले आहेत. अफगाणिस्तानातून पळून गेलेल्या राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडण्याचे कारण स्पष्ट केले आहे. फेसबुकवर रात्री उशिरा त्यांनी याबाबत माहिती दिली. लोकांना जास्त रक्तपात पाहावा लागू नये म्हणून आपण अफगाणिस्तानातून पळून गेलो, असे घनी यांनी म्हटले आहे.
जर मी अफगाणिस्तानमध्ये राहिलो असतो तर मोठ्या संख्येने लोक देशासाठी लढायला आले असते. अशा स्थितीत असंख्य लोक तिथे मरण पावले असते. तसेच काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असते. आता तालिबान जिंकला आहे. आता तो अफगाण लोकांच्या सन्मान, मालमत्ता आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे. तालिबान एका ऐतिहासिक परीक्षेला सामोरे जात आहे. आता ते अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवतील,असे घनी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
अफगाणिस्तानवर तालिबान दहशतवादी संघटनेने संपूर्ण ताबा मिळवल्यानंतर आता युद्ध संपल्याची घोषणा केली आहे. यामुळे अफगाणिस्तानात तालिबनची सत्ता स्थापन झाली आहे. तालिबानने रविवारी राजधानी काबूलचा ताबा घेतला. यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांच्यासह उपराष्ट्रपती आणि अन्य राजकारण्यांनी देश सोडला. लाखोंच्या संख्येने नागरिक देश सोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामुळे विमानतळ परिसरात देशातून पळ काढण्यासाठी धडपड सुरु आहे. अशातच काबूल विमानतळावर रविवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारात पाच नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Previous Articleदहा जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न
Next Article असनिये-तांबोळी रस्त्याची श्रमदानातून साफसफाई









