खासदार फ्रान्सिस सार्दिन यांची माहिती
प्रतिनिधी / पणजी
गोव्यातील सुमारे 8000 खलाशी विविध राष्ट्रांमध्ये जहाजांवर काम करीत आहेत व त्यांना मायदेशी परतायचे आहे. त्यांचे नातेवाईक चिंतेत आहेत. आपण यासंदर्भात केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि जहाजोद्योग मंत्र्यांशीही चर्चा केली. तथापि सध्या संपूर्ण जगातच विमानसेवा ठप्प असल्याने सध्या तरी हे शक्य नाही, असे त्यांनी कळविल्याचे दक्षिणेचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी सांगितले.
आपण या सर्वांचा गांभीर्याने विचार केला. पालक मंडळीही अडचणीत आहेत. तथापि परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि जहाजोद्योग मंत्र्यांशी चर्चा करून या मंडळीना गोव्यात परत आणा, अशी विनंती केली असता ही मंडळी केवळ एक दोन देशात नाहीत तर संपूर्ण जगात जहाजे जातात त्या त्या ठिकाणी विखुरलेली आहेत. त्यातील कित्येकजण हे जहाजांवरच अडकून पडलेले आहेत. कोणताही देश त्यांना सध्या लॉकडाऊनच्या काळात घेऊ शकत नाहीत. जी मंडळी बोटीवर नाहीत अशाना देखील घरातून बाहेर पडण्यास त्या त्या देशांनी परवानगी दिलेली नाही. त्यातच जगातील बहुतेक सर्व राष्ट्रांमध्ये विमानसेवाही बंद आहे. त्यामुळे विमानसेवा सुरू झाल्यानंतरच त्यावर विचार करता येईल असे आपल्याला केंद्र सरकारने कळविल्याचे सार्दिन यांनी सांगितले.
घरोघरी सर्वेक्षण! गरज आहे का?
गोवा सरकारने शिक्षकांची मदत घेऊन घरोघरी सर्वेक्षण करून सर्दी, तापाने आजारी असलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्याचे ठरविले असल्याची माहिती आपल्याला मिळाली. राज्यस्थानमध्ये एक डॉक्टर, दोन नर्सेस, तसेच तपासणीसाठीची आवश्यक यंत्रणा व त्यात कर्मचारी घेऊन त्यांचे गट घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहेत. गोवा सरकार ज्यांची नियुक्ती करणार ते तज्ञ आहेत का? सध्याच्या कालावधीत कोणी त्यांना दारावर तरी उभे करून घेणार का? असा सवाल सार्दिन यांनी केला. त्यापेक्षा सरकारने जनतेला घरातून बाहेर पडू नये यासाठीची सक्ती करावी आणि ज्यांना सर्दी, ताप असेल त्यांनी त्वरित डॉक्टराकडे जाऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन सार्दिन यांनी केले.
केवळ 8 दिवसांचा लॉकडाऊन वाढवा
खा. सार्दिन यांनी राज्य सरकारने लॉकडाऊनचा कालावधी पुढील 8 दिवसांपुरताच वाढविण्याची मागणी केली. मात्र पुढील काही दिवस गोव्यात परराज्यातून कोणालाही प्रवेश देऊ नका. गोव्याच्या सर्व सीमा सील करा. देश विदेशातून कोणालाही प्रवेश देऊ नका, अशी मागणी केली. राज्यात सरकार व्यवस्थित नसल्यानेच जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा झालेला नाही व वस्तुंचे दर प्रचंड वाढविण्यात आले. याबद्दल खा. सार्दिन यांनी नाराजी व्यक्त केली.









