लँडिंग गियरमध्ये लपलेला – 16 वर्षीय मुलगा केनियामधून नेदरलँडमध्ये पोहोचला
केनियाच्या नैरोबी विमानतळावरून एक मालवाहतूक करणारे विमान तुर्कस्तान आणि ब्रिटनमार्गे नेदरलँड येथे पोहोचले, म्हणजेच एकूण 8 हजार किलोमीटरचा प्रवास या विमानाने केला. या पूर्ण प्रवासात विमानाच्या लँडिंग गियरमध्ये 16 वर्षीय एक मुलगा लपून राहिला. हा मुलगा आता नेदरलँडच्या मास्त्रिख्त शहरात एका रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती सुधारत आहे.
विश्वास बसणे अवघड
केनियाच्या नैरोबी येथून बुधवारी एअरबस ए330 कार्गो विमानाने उड्डाण केले. 16 वर्षीय केनियन मुलगा याच्या लँडिंग गियरमध्ये कसा लपून बसला हे अद्याप समजले नाही. ब्रिटननंतर हे विमान शुक्रवारी दुपारी नेदरलँडच्या मास्त्रिख्त विमानतळावर उतरले. अभियंत्यांनी विमानाची तपासणी केली असता लँडिंग गियरमध्ये हा मुलगा आढळला, त्याला बाहेर काढून वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.
जिवंत राहणे चमत्कारच
प्रदीर्घ प्रवासामुळे या मुलाला हापोथर्मिया झाल्याचे वैद्यकीय तज्ञांकडून सांगण्यात आले आहे. एखाद्या कारणामुळे शरीराचे तापमान धोकादायक पातळीपर्यंत कमी झाल्याची ही स्थिती उद्भवते. यात नसा गोठतात आणि यातून मृत्यूही ओढवू शकतो. पण हा मुलगा जिवंत कसा राहिला याचेच आश्चर्य डॉक्टरांना वाटत आहे.
दैवानेच तारले
हा मुलगा विमानापर्यंत कसा पोहोचला याचा शोध नेदरलँड्सचे विमानोड्डाण तज्ञ घेत आहेत. विमान बहुतांश वेळ 38 हजार फुटांच्या उंचीवर होते, या उंचीवर प्राणवायूची पातळी अत्यंत खालावते, अशा स्थितीत जिवंत राहणे जवळपास अशक्य असते. याचबरोबर विमानाच्या लँडिंगवेळी चाकं खुली होतात. एखादा त्यात लपलेला असल्यास जमिनीवर पडून मरू शकतो. याच्यासोबत दोन्ही प्रकार घडले नाहीत.
यापूर्वी दोनदा प्रकार, प्रत्येकवेळी मृत्यू
2019 मध्ये केनिया एअरवेजच्या एका विमानात अशाचप्रकारची घटना घडली होती. हे विमान लंडनच्या हीथ्रो विमानतळावर पोहोचले होते. लँडिंग गियरमध्ये एक माणूस लटकत असल्याचे दिसून आले होते. 1997 मध्येही असेच घडले होते. त्यावेळी नैरोबीतूनच विमान आले हेते आणि ते ब्रिटनच्या गॅटविक विमानतळावर उतरले होते. याच्या पुढील लँडिंग पार्टवर एका केनियन नागरिकाचा मृत्यू मिळाला होता.









