सुसज्ज कार्गो टर्मिनलसाठी नागरी उड्डाण मंत्रालयाकडे प्रस्ताव
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव विमानतळावरून काही प्रमाणात कार्गो सेवेला सुरुवात झाली आहे. बेळगावमधून मुंबई व बेंगळूर या दोन शहरांना स्पाईस जेट ही कंपनी कार्गो सेवा देत आहे. आतापर्यंत विमानतळावरून 57 मेट्रिक टन साहित्याची वाहतूक केली आहे. यामुळे भविष्यात बेळगावमधून स्वतंत्र कार्गो सेवा सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
विमानतळावरून जून 2019 मध्ये कार्गो सेवेला सुरुवात झाली. बेळगाव ही व्यापारी बाजारपेठ असल्यामुळे साहित्याची ने-आण मोठय़ा प्रमाणात होत असते. बेळगाव जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात कृषी उत्पादन होत असल्याने इतर राज्यांमध्ये त्याला चांगली मागणी आहे. त्यामुळेच मागील अनेक वर्षांपासून बेळगावमधून कार्गो सेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. स्पाईस जेटने सुरू केलेल्या कार्गो सेवेला उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळेच दररोज माल वाहतुकीला मागणी वाढत आहे. ऑक्टोबर 2020 पर्यंत एकूण 57 मेट्रिक टन साहित्याची वाहतूक करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. सध्या विमानतळाच्या जुन्या टर्मिनलमधून ही वाहतूक केली जात आहे. परंतु लवकरच सुसज्ज असे कार्गो टर्मिनल करण्यासाठीचा प्रस्ताव नागरी उड्डाण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे.









