प्रवाशांमधून बसची होतेय मागणी : परिवहन मंडळाचे अद्याप दुर्लक्षच, खासगी वाहनचालकांकडून लूट
प्रतिनिधी /बेळगाव
सांबरा येथील विमानतळावर उतरल्यानंतर बेळगाव शहरात येण्यासाठी फेरीबससेवा उपलब्ध नाही. यामुळे एक तर विमानतळावर असणाऱया कार व रिक्षांमधून प्रवास करावा लागतो. अन्यथा सांबरा मुख्य रस्त्यावर येऊन बस पकडावी लागते. त्यामुळे विमानतळापासून शहरात येण्यासाठी फेरीबससेवा पुन्हा पूर्ववत करण्याची मागणी होत आहे. परंतु या मागणीकडे परिवहन मंडळाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.
बेळगाव शहरापासून 14 ते 15 कि. मी. अंतरावर सांबरा विमानतळ आहे. विमानतळावर दररोज शेकडो प्रवासी ये-जा करीत असतात. ज्या प्रवाशांकडे स्वतःच्या गाडय़ा नाहीत, अशा प्रवाशांना खासगी कार अथवा सांबरा गावापर्यंत जाणाऱया बसने जावे लागते. तसेच विमानतळावरून शहरात येण्यासाठीदेखील हीच परिस्थिती आहे. काहीवेळा खासगी चालकांकडून अक्वाच्या सव्वा दर आकारण्यात येतो. त्यामुळे प्रवाशांमधून फेरीबस सुरू करण्याची मागणी होत आहे.
यापूर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये विमानतळापासून उद्यमबागपर्यंत फेरीबस सुरू करण्यात आली होती. परिवहन विभागाने नॉनएसी बस या मार्गावर सुरू केल्या. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत होता. दिवसभरात चार फेऱया सुरू ठेवण्यात आल्या होत्या. परंतु कोरोनामुळे ही फेरी बससेवा बंद करण्यात आली. तेव्हापासून आजतागाहेत बससेवा बंदच आहे.
विमानतळ प्राधिकरणाकडूनही परिवहन मंडळाला पत्र
बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱया प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिल्ली येथून 180 च्या आसपास प्रवासी दाखल होत आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी फेरीबससेवा सुरू करणे आवश्यक आहे. बेळगाव विमानतळ प्राधिकरणाकडूनही परिवहन मंडळाला पत्र पाठविण्यात आले असून परिवहन मंडळाने त्वरित बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.









