प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱयांची संख्या कमालीची वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेची योग्य खबरदारी घेणे तितकेच गरजेचे होत आहे. यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून जुन्या टर्मिनल बिल्डींगमध्ये वैद्यकीय तपासणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. आरोग्याची समस्या उद्भवल्यास प्रवाशांना तातडीची सेवा देण्यासाठी हा कक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
सांबरा विमानतळावरून देशातील महत्त्वाच्या शहरांना सेवा देण्यात येत असल्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. लॉकडाऊननंतर तब्बल 1 लाख प्रवाशांनी विमानप्रवास केला आहे. राज्यातील बेंगळूर व मंगळूर या दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांनंतर सर्वाधिक प्रवासी हे बेळगावमधून प्रवास करीत असल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या प्रवासी संख्येतून समोर आले आहे. सध्या दररोज 1 हजार 200 च्या आसपास प्रवासी या विमानतळावरून प्रवास करीत आहेत. तर 25 ते 26 विमानांची ये-जा सुरू असते.
प्रवाशांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागत आहे. प्रवाशांवर प्राथमिक उपचार व्हावा, यासाठी वैद्यकीय तपासणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. रुग्णावर प्राथमिक उपचार करता येतील, अशी व्यवस्था या कक्षामध्ये करण्यात आली आहे. जुन्या टर्मिनलच्या इमारतीमध्ये या कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांच्यादृष्टीने हा कक्ष महत्त्वाचा ठरणार आहे. यामध्ये सुविधा पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे.