प्रतिनिधी/ बेंगळूर
मंगळूरच्या बाजपे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवणाऱया आरोपीने बुधवारी सकाळी स्वतः बेंगळूर गाठून पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे. आदित्य राव (वय 36) असे त्याचे नाव असून त्याने आपणच बॉम्ब ठेवल्याची कबुली दिली आहे. त्याला अधिक चौकशीसाठी बेंगळूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याने कोणाच्या सांगण्यावरून हे कृत्य केले आहे का?, याचा तपास केला जात आहे.
सोमवारी सकाळी मंगळूर विमानतळावर बॉम्ब आढळून आल्याने खळबळ उडाली होती. नंतर बेंगळूरच्या बॉम्ब निकामी पथकाने तो बॉम्ब निर्जनस्थळी स्फोट घडवून निकामी केला होता. या घटनेनंतर राज्यातील सर्व विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. पेलिसांनी मंगळवारी सीसीटीव्ही कॅमेऱयात टिपलेल्या छायाचित्राच्या आधारे आदित्य राव याच्या कुटुंबीयांची चौकशी केली. त्याचा शोध जारी असतानाच त्याने स्वतः वेश बदलून ट्रकने बेंगळूर गाठले. यानंतर राज्य पोलीस महासंचालक निलमणी एन. राजू यांच्या निवासस्थानी शरणागती पत्करली.
बेंगळूरच्या उलसूर गेट पोलिसांनी त्याला अटक करून सहाव्या एसीएमएम न्यायालयात हजर केले. यानंतर न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशानुसार त्याची वैद्यकीय तपासणी करून मंगळूर पोलिसांच्या स्वाधीन केले. गुरुवारी सकाळी त्याला मंगळूरमधील न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्या. जगदीश यांनी दिले. सायंकाळी त्याला विमानाने मंगळूरला नेण्यात आले.
बीई, एमबीए पदवीधर असलेल्या आदित्य राव याने यापूर्वी बेंगळूरच्या केंपेगौडा विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आल्याचा निवावी फोन करून धमकी दिली होती. या प्रकरणी त्याने 1 वर्षाचा कारावास भोगला होता. तो मंगळूरमधील हॉटेलमध्ये काम करीत होता. पदवीधर असून देखील शिक्षणानुरूप नोकरी मिळत नसल्याने तो खचला होता. तो ज्या ठिकाणी काम करीत असे तेथील इतर कर्मचारी त्याच्या वर्तनाला कंटाळले होते, अशी माहितीही चौकशीतून पुढे आली आहे.
हॉटेलमधील वर्तनही विचित्र
मंगळूर विमानतळाच्या तिकीट काऊंटरजवळ लॅपटॉपच्या बॅगेत ठेवलेल्या बॉम्ब तयार करण्यासाठी त्याने युटय़ूबमधील व्हिडीओचा वापर केला होता. बुधवारी त्याला अटक केल्यानंतर त्याच्याजवळ असणाऱया बॅगेतील साहित्यामध्ये व्हाईट सिमेंट आढळून आले. ते त्याने ऑनलाईनवरून आपण रहात असलेल्या हॉटेलमध्ये मागविले होते. त्याने वापरलेल्या स्फोटकासंबंधी माहिती मिळविण्यासाठी एनआयए पथकाने हॉटेलला भेट दिली. सदानंद शेट्टी यांच्या मालकीच्या हॉटेलमधील कर्मचाऱयांची चौकशी केली असता आदित्य रावचे वर्तन विचित्र असल्याचे माहिती मिळाली. कोणाशी अधिक संभाषण नसले तरी दिलेले काम तो चोख करीत असे. लॅपटॉपची बॅग तो कायम आपल्याजवळच ठेवत असे, अशी माहिती हॉटेलचा कर्मचारी बाबू हेगडे याने पोलिसांना दिली आहे.
पाच वर्षापासून कुटुंबाशी संपर्क तोडला
अटकेतील आरोपी आदित्य राव याचा भाऊ अक्षत राव यांनी, मागील पाच वर्षापासून भावाशी कोणताही संपर्क ठेवलेला नाही. त्यामुळे त्याच्या कृत्याविषयी आपल्याला कोणतीही माहिती नाही. मागील वेळीच आपण त्याला गैरवर्तनाबद्दल समज दिली होती. आपल्या आईचे निधन झाल्यानंतर याविषयी त्याला माहिती दिली होती. त्यावेळी तो कारागृहात होता, अशी प्रतिक्रिया दिली.
15 वर्षात 18 ठिकाणी खासगी नोकरी
आदित्य राव हा मनोरुग्ण असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. कारण त्याने 15 वर्षात बेंगळूर आणि मंगळूर शहरात 18 वेगवेगळय़ा ठिकाणी काम केले आहे. सुरुवातीला एका खासगी बँकेत काम करीत असलेल्या आदित्य राव याने तेथील वातानुकूलित यंत्राचा (एसी) त्रास होत असल्याचे सांगून नोकरी सोडली होती. नैसर्गिक हवा आणि वेळेत जेवणाची व्यवस्था होते. या कारणामुळे बेंगळूर विमानतळाच्या सुरक्षारक्षक पदासाठी अर्ज केला होता. पण त्याचा अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे तो संतप्त झाला. या कारणामुळे त्याने एजन्सीच्या प्रतिनिधींशी वाद घातला होता. त्यामुळे त्याने विमानतळावर बॉम्ब ठेवल्याच्या धमकी दिली होती.









