मार्चअखेरपर्यंत काम पूर्णत्वास : बेळगावातच राहणार दोन्ही वैमानिक प्रशिक्षण केंदे
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावच्या सांबरा विमानतळावर टॅक्सी ट्रक उभारण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. धावपट्टीपासून ते वैमानिक प्रशिक्षण केंद्राच्या हँगरपर्यंत टॅक्सी ट्रक उभारला जात आहे. मार्च अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर वैमानिक प्रशिक्षण केंद्राच्या कामालाही सुरुवात होणार आहे.
देशातील पाच विमानतळांवर वैमानिक प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याचा निर्णय हवाई उड्डाण मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आला होता. बेळगाव विमानतळाला दोन प्रशिक्षण केंद्रे मंजूर झाली आहेत. केंद्र सरकारने बांधा-वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वावर ही प्रशिक्षण केंदे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. निविदा काढल्यानंतर दिल्ली येथील रेडबर्ड व बेंगळूर येथील समवर्धने या दोन्ही खासगी विमान प्रशिक्षण कंपन्यांना अंतिम मंजुरी देण्यात आली.
दोन्ही वैमानिक प्रशिक्षण केंद्रांसाठी टॅक्सी टॅक उभारण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी निविदा काढण्यात आल्या होत्या. निविदा मंजूर झाल्यानंतर काँक्रिटचा टॅक्सी ट्रक उभारण्याचे काम सुरू झाले. विमानतळाच्या धावपट्टीपासून ते प्रशिक्षण केंद्राच्या हँगरपर्यंत हा ट्रक उभारला जात आहे. याचे काम अंतिम टप्प्यात असून मार्चपर्यंत टॅक्सी ट्रक खुला केला जाणार आहे.
चर्चांना मिळाला पूर्णविराम!
बेळगाव येथे होणाऱया दोन वैमानिक प्रशिक्षण केंद्रांपैकी एक प्रशिक्षण केंद्र हुबळी विमानतळावर हलविले जाणार असल्याच्या चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. आधीच अनेक सरकारी कार्यालये, आयआयटी हुबळीला गेल्याने असणाऱया नाराजीमध्ये आणखी भर पडली होती. परंतु या चर्चा व बातम्या वायफळ होत्या. बेळगावमध्येच दोन्ही प्रशिक्षण केंदे लवकर सुरू होणार असल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.









