बेंगळूर
सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनी विप्रोने आपल्या भारतातील आणि अमेरिकेतील कर्मचाऱयांना पुढील वर्षी जानेवारीच्या मध्यावरपर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विप्रोने एकंदर परिस्थितीचा अंदाज घेत यासंबंधीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंपनीने 18 जानेवारीपर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याचे आवाहन कर्मचाऱयांना केले आहे. बेंगळूर स्थित आयटी सेवा पुरवणाऱया कंपनीने यासंबंधीचे पत्र आपल्या कर्मचाऱयांना पाठवले आहे. जे नियमितपणे ऑफिसमध्ये जात आहेत त्यांच्यासाठी कोणताही बदल करण्यात आला नसल्याचेही विप्रोने स्पष्ट केले आहे. अमेरिका, भारत वगळता इतर देशांतील वर्क फ्रॉम होमच्या योजनेबाबतचा निर्णय तेथील प्रत्यक्ष परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर घेतला जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.









