दिगवळेतील तरुणाने तब्बल एक महिना सोसला त्रास : नाकात गेलेल्या जळूने झाला होता हैराण
चंद्रशेखर देसाई / कणकवली:
रानातील पाणवठय़ावर ओंजळीने पाणी पीत असताना नळकत जळूने पाण्यावाटे नाकात प्रवेश केला. विशेष म्हणजे एक-दोन दिवस नव्हे, तर तब्बल महिनाभर जळू नाकातच लॉकडाऊन झाली. मात्र, या लॉकडाऊनच्या कालावधीत जळू शांत बसलेली होती, तरीही आपले काम तिने चोख बजावत ती तब्बल तीन ते चार इंच लांबीची बनली. त्यामुळे नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला. ‘घोळणा फुटला’ म्हणून उपचार करून उपयोग न झाल्याने बारकाईने पाहिले असता, आत जळू असल्याचे निष्पन्न झाले. रात्रीच्यावेळी जाग नसताना ही जळू शेपटीकडच्या बाजूने थोडी बाहेर येत असल्याचे त्या युवकाने सांगताच डॉक्टरांनी शक्कल लढवत दिवसाच काळोख केला. तब्बल 40 मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर शांतता पाहून जळूने चळवळ सुरू करीत शेपटीकडील बाजूने बाहेर आली अन् क्षणाचाही विलंब न करता डॉ. पराग मुंडले यांनी चिमटय़ा (फोरसेफ) च्या सहाय्याने तिला पकडत बाहेर काढली अन् युवकाची जीवघेण्या प्रसंगातून सुटका केली.
दिगवळे-रांजनवाडीतील दहावीची परीक्षा दिलेला शुभम परब हा युवक महिन्याभरापूर्वी काही कामानिमित्त रानात गेला होता. त्याठिकाणी तहान लागल्याने एका पाणवठय़ावर तो पाणी प्यायला होता. या पाणवठय़ावरील पाण्यात छोटय़ा जळू होत्या. पाणी पीत असताना नकळत यातील एक जळू त्या युवकाच्या नाकात गेली हे त्यालाही कळले नाही.
25 दिवसानंतर जाणीव
जळू नाकात गेल्यानंतर सुमारे 25 दिवस शुभमला याबाबत काहीच कल्पना नव्हती. किंबहुना त्याला काही जाणीवही झाली नाही. त्यामुळे पाण्याच्या माध्यमातून जळू आपल्या नाकात आहे, याबाबत शुभम अनभिज्ञच होता. मात्र, नंतर त्याला नाकातून रक्त येत असल्याने त्रास होऊ लागला. शुभम जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन आला. त्यावेळी उन्हाळय़ात घोळणा फुटल्याने असा रक्तस्त्राव होतो. त्यामुळे त्याला औषधे देण्यात आले. मात्र, रक्त यायचे थांबत नव्हते.
27 रोजी डॉ. मुंडलेंकडे
याच स्थितीत शुभम नाटळ येथील डॉ. पराग मुंडले यांच्या क्लिनिकमध्ये आला. यावेळीही नाकातून रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे डॉ. मुंडले यांनी त्याला नाक, कान, घसा तज्ञाकडे जाण्याचा सल्ला दिला. शुभम म्हणाला, आतमध्ये काही तरी जळूसारखे आहे. रात्रीच्यावेळी शेपटी बाहेर काढते. यावेळी नातेवाईकांनी सांगितले, तुम्ही काय आहे, ते बघा, ट्राय करा म्हणून बॅटरी मारून पाहिले असता, बॅटरीच्या उजेडात जळू आतमध्ये खोलवर दिसत होती. मात्र, तोंड किंवा शेपूट असे काहीच दिसत नव्हते. चिमटा नाकाला स्पर्श करताक्षणी जळू आपले वेटोळे खूप आतमध्ये न्यायची. त्यामुळे कोणत्याही प्रयत्नांना यश येत नव्हते.
प्रसंग बाकाच
डॉ. मुंडले म्हणाले, जळू नाकात असल्याचे निश्चित झाले होते. मात्र, काढायची कशी, हा प्रश्न होताच. कदाचित घशात किंवा वरती frontal cavity कडे सरकल्यास बाका प्रसंग होता. नाकही रक्ताने भरलेले होते. काही डॉक्टर म्हणाले, भूल देऊनच काढावे लागेल. शुभमशी चर्चा केल्यावर तो म्हणाला, चाहूल नसली व अंधार असला, की जळू नाकपुडीच्या बाहेर शेपूट काढते.
अन् जळू सापडलीच
डॉ. मुंडले यांनी शक्कल लढवत लागलीच क्लिनिकमधील लाईट, पंखे आवाज बंद केला. सर्वत्र शांतता पसरल्यानंतर 40 मिनिटे प्रतीक्षा करत थांबावे लागले. त्यानंतर जळूची शेपूट शुभमच्या नाकातून बाहेर येत असल्याचे दिसू लागले. अन् शुभमने जळू खाली सरकत असल्याचे खुणेने सांगताच फोरसेफ घेऊन शुभमच्या नाकातून बाहेर सरकणारी 3 ते 4 इंच जळू ओढून काढली. ओढून काढताना ती सुमारे 7 ते 8 इंच लांब झाली होती. त्यानंतर शुभम आनंदाने घरी गेला.









