विनायक खेडेकर यांनी लोकसंस्कृती, लोक परंपरा, आदिवासी जनजीवन व अन्य विषयांशी संबंधित अभ्यास करून पुढच्या अनेक पिढय़ांना उपयुक्त ठरेल असे नवनीत निर्माण केले. त्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला.
वय वर्षे 82 असलेले, सहा दशकांहून अधिक काळ गोव्याची लोकसंस्कृती, आदिवासी लोकजीवन, आदिम परंपरा, रुढी, व्रत-वैकल्ये, सण, उत्सव, जीवनशैली, खान-पान, लोककला-लोकनृत्ये, हस्तकला यांचा डोळसपणे, जिव्हाळय़ाने अभ्यास करून लोकसाहित्याच्या क्षेत्रात अनन्यसाधारण योगदान देणारे व्रतस्थ अभ्यासक, संशोधक विनायक खेडेकर यांना देशाच्या अभिवृद्धीसाठी जाहीर झालेला ‘पद्मश्री’ पुरस्कार म्हणजे त्यांचा आणि अवघ्या गोव्याचा सन्मान आहे. प्रत्येक पुरस्कार आपल्यावरील जबाबदारी वाढवून गेला तशीच पद्मश्रीनेही आपल्यावरील जबाबदारी वाढविलेली आहे. ती पेलण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नरत राहण्याचा निश्चय त्यांनी केला आहे. खेडेकरांचे हे असिधाराव्रत असून ‘घेतला वसा टाकू नये’ च्या व्यापक अधिष्ठानावर ते भक्कमपणे उभे आहे.
गोव्याच्या लोकसंस्कृतीचा अभ्यास, लोककला कार्यक्रमाच्या संकल्पना, आरेखन, आयोजन, लेखन, प्रबंध सादरीकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकसांस्कृतिक प्रवास, निरीक्षण, प्रबंध सादरीकरण याबरोबरच नाटक, ललित लेखन एवढेच नव्हे तर कीर्तन, पत्रकारितेतही खेडेकर यांनी योगदान दिले आहे. त्यांनी जे पाहिले तेच लिहिले आणि संशोधनाच्या पद्धतीनुसार, संकेतांनुसार, सिद्धांतानुसार लिहिले. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे गोव्याची खरी लोकसंस्कृती देशालाच नव्हे, तर जगालाही त्यांनी दाखवून दिली. पोर्तुगीजांची संस्कृती म्हणजे गोव्याची संस्कृती नव्हे, गोव्याची स्वतंत्र, व्यापक, मानवताप्रगल्भ संस्कृती असून तिचे अधिष्ठान परोपकार, सहकार्यावर आधारित आहे, हे खेडेकर यांनी देशाला आणि जगालाच नव्हे, तर स्वतःच्या संस्कृतीपासून भरकटलेल्या गोवेकरांनाही दाखवून दिले. गोव्याचे काय अन् पोर्तुगीजांचे काय, हे त्यांनी ठासून सांगितले. स्वतः ब्राह्मण कुटुंबात जन्मूनही हे संस्कृतचे भिक्षुक बहुजन समाजाशी एकरुप झाले. बहुजन समाजाने लोकसंस्कृती रक्षणासाठी केलेल्या कार्याला ते सलाम करतात आणि स्वतःच्या लोकसाहित्याचे अधिष्ठानही मानतात. खेडेकर यांच्या मते गोव्याची लोकसंस्कृती जपली, तिला संवर्धित केले ते बहुजन समाजाने आणि आदिवासी समाजाने.
आजकाल मोठमोठय़ा पदव्या घेतल्या जातात, मात्र प्रत्यक्षात पुढचे पाठ मागचे सपाट अशी परिस्थिती असते. खेडेकर यांनी कोणतेही लौकिक शिक्षण घेतले नाही, ते ना गेले प्राथमिक शाळेत ना हायस्कुलात, ना महाविद्यालयात, ना विश्वविद्यालयात! गुरुकुल पद्धतीने संस्कृत, वैदिक शिक्षण घेतले. तरीही आयुष्यभर लोकसंस्कृतीचा प्रभावी अभ्यास आणि पद्धतशीरपणे संशोधनात्मक साहित्यनिर्मिती सुमारे बाराहून अधिक ग्रंथांमधून केली. त्यांच्या ंसंशोधनाचा आधार घेऊन पीएचडी करणारे अनेक विद्यार्थी पुढे जातात. संस्कृत किंवा गुरुकुलाशिवाय कुठेही शिक्षणासाठी न जाता खेडेकर यांनी कोकणी, मराठी, हिंदी, इंग्रजीसह पोर्तुगीज भाषेचेही ज्ञान आत्मसात केले आणि ते त्यांच्या ग्रंथनिर्मितीसाठी त्यांना उपयुक्त ठरले. हे सारे का घडले तर त्यांनी वाचन भरपूर केले, दुसऱयांचे भरपूर ऐकले, भरपूर क्षेत्रीय पाहणी केली. स्वतःला माहीत नाही, त्या गोष्टी लपविल्या नाहीत, उलट त्या जाणून घेण्याचाच प्रयत्न केला.
खेडेकर यांनी लोकसंस्कृती, लोक परंपरा, आदिवासी जनजीवन व अन्य विषयांशी संबंधित अभ्यास करून पुढच्या अनेक पिढय़ांना उपयुक्त ठरेल असे नवनीत निर्माण केले. त्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला, त्याबद्दल त्यांना वाटतं की हा आपल्या एकटय़ाचा सन्मान नाही, हा माझ्या या प्रवासात मला साथ देणाऱया हजारो साथीदारांचा सन्मान आहे.
सुरुवातीच्या काळात खेडेकर यांनी अनेक गावातील मंदिरांमधून कीर्तने केली. पत्रकारितेच्या दालनातही गोव्यातील वृत्तपत्रांबरोबरच महाराष्ट्रातील वृत्तपत्रे, साप्ताहिकांसाठी लेखन केले. समाचार भारती व हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थांसाठीही पत्रकारिता केली. त्याचबरोबर ललित, नाटय़ लेखन करता करता खेडेकर लोकसंस्कृतीच्या अभ्यासकडे वळले…आणि आजपर्यंत हे लोकसंस्कृतीचे व्रत पाळत आहेत. हे व्रत त्यांनी का अंगीकारले? बालपणापासून त्यांनी गोव्याच्या लोकसंस्कृतीच्या अनेक चांगल्या गोष्टी पाहिल्या, त्यांचा त्यांच्या मनावर सकारात्मक परिणाम झाला आणि हे काहीतरी दिव्य आहे, त्याची आपण उपासना, व्रत करायला हवे असे वाटल्याने त्यांनी ते स्वीकारले आणि आजपर्यंत ते पाळत आहेत. तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरू गोव्यात आले तेव्हा त्यांना जे काही दाखविले ते पोर्तुगालीच होते, गोव्याचे नव्हते, म्हणून खंती झालेल्या खेडेकर यांना गोव्यातील ‘चोगम’ या आंतराराष्ट्रीय परिषदेच्यावेळी, ज्यामध्ये जगातील 112 देश सहभागी झाले होते तेव्ही सुवर्णसंधी मिळाली ती गोव्याची खरी लोकसंस्कृती या राष्ट्रप्रमुखांना दाखविण्याची. सहा दशकांहून अधिक काळ गोव्याच्या लोकसंस्कृतीचा अभ्यास केल्यानंतर आज त्यांना एवढेच वाटते की आपल्या गोव्याची, आपल्या देशाची लोकसंस्कृती खूप समृद्ध, खूप मानवीय असून शांती, पैसा, प्रतिष्ठा शोधण्यासाठी आपल्या लोकांना जगाच्या पाठीवर कुठेच जाण्याची गरज नाही. जगच तुमच्याकडून शिकत आहे तर तुम्ही कुठे उगाच जगात भरकटण्यासाठी जाता असे त्यांना वाटते. गोव्याच्या आजच्या सांस्कृतिक वातावरणाबद्दल त्यांना खूप आनंद वाटतो, मात्र गोव्याच्या धालो, घोडेमोडणी, गोफ, फुगडी व अन्य लोककला सादर करताना त्यामध्ये कोरियोग्राफर नावाचा प्राणी नको. तुम्ही असा डान्स करा, असे फेशियल एक्सप्रेशन्स दाखवा हे सांगणारा तो नको. तुमचे लाईट इफेक्टस नको, किंबहुना या कला उघडय़ा रंगमंचावरच, नैसर्गिक वातावरणात व्हायला हव्यात तरच त्यांचे खरे अस्तित्व या पिढय़ाना कळणार आहे, हे खेडेकरांचे मत ‘ओरिजीनॅलीटी’कडे जाणारेच आहे. मात्र बदलत्या काळाप्रमाणे काही बदल केले नाहीत, तर हे संचित नामशेष होण्याची भीतीही ते व्यक्त करतात.
आपल्या देशातील विद्यमान वातावरणाबद्दल ते खूप आशादायी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशासाठी खूप परिश्रम घेणारे, देशाचा गौरव वाढविणारे, सैन्यदल व देशासाठी स्वतःचे योगदान देणाऱया सर्वांना प्रेरणा देणारे पंतप्रधान लाभले आहेत, असेही ते नमूद करतात. अभ्यासक, संशोधक वृत्तीच्या युवा पिढीला संदेश देताना त्यांचे म्हणणे आहे, ‘घेतला वसा टाकू नका. भरपूर क्षेत्रीय पाहणी करा, ऐकीव माहितीवर विसंबून राहू नका. चिंतन-मनन करा, म्हणजे नवनीत तुमच्या हाती येईल!’
राजू भि. नाईक








