सावंतवाडीत पोलीस, पालिकेची मोहीम
सावंतवाडी
कोरोनाचा प्रादुर्भाव असताना सावंतवाडी बाजारपेठेत विनामास्क फिरणाऱया व्यक्तींवर नगरपालिका व पोलिसांनी कारवाई केली. तसेच मोटारवाहन नियम तोडणाऱयांवरही कारवाई हाती घेण्यात आली आहे. गुरुवारी दुपारपर्यंत मास्क न वापरणाऱया सहाजणांवर दोनशे रुपयाप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे मास्कशिवाय फिरणारे पळवाटा काढत होते.
शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक नागरिकाने कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. तोंडाला मास्क वापरणे बंधनकारक आहे. न. प. कडून तशी कारवाई होणे गरजेचे आहे. नागरिक बाजारात विनामास्क दुचाकीवरून फिरत आहेत. गेले दोन दिवस न. प. कर्मचारी, पोलीस व होमगार्डच्या मदतीने विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई मोहीम सुरू केली. गुरुवारी नगरपालिका कर्मचारी कमलेश परब, वाहतूक पोलीस
प्रवीण सापळे, सखाराम भोई, होमगार्ड दिनेश बरगडे, सविता जंगले, शंकर भांडये यांच्या मदतीने कारवाई मोहीम राबविली.
वाहतुकीचे नियम तोडणाऱयांवर कारवाई
सूसाट वेगाने दुचाकी हाकणे, फॅन्सी नंबर, परवाना नसणे, ट्रिपल सीट, आरसे नसणे, अल्पवयीन मुले वाहन चालविणे, वाहतुकीस अडथळा करून वाहन पार्क करणे आदी नियम तोडणाऱया वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांबरोबरच जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस, होमगार्ड यांच्या मदतीने ही मोहीम राबविली जात आहे. शहरात एक महिन्यापासून चौकाचौकात पोलीस व होमगार्ड तैनात आहेत. वाहतूक कोंडी बरीच कमी झाली आहे. एका ज्येष्ठ नागरिकाला पोलिसांनी कारवाईसाठी थांबविले असता त्यांनी आपणास मास्क वापरल्याने श्वास घेण्यास अडचण होत असल्याचे सांगितले.
मास्कच्या किमती वाढल्या
कोरोनाच्या सुरुवातीला राजकीय पदाधिकारी, नगरपालिका, संस्था, मंडळे, सामाजक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मोफत मास्कचे वितरण करण्यात आले. बाजारातही मास्कची किंमत दहा ते वीस रुपयांपर्यंत होती. मात्र, पुढील दोन महिन्यात मोफत मास्क वितरण बंद झाल्याने दुकानात मास्कची विक्री होऊ लागली. मात्र, त्याच्या किमती नागरिकांना परवडणाऱया नाहीत. प्रशासनाने मास्कच्या किमतींवर निर्बंध आणावेत, अशी मागणी आहे.









