सातारा / प्रतिनिधी :
वाई शहरातून रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कोळशाची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोचालकावर वनगुन्हा दाखल करुन वाई वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱयांनी त्याच्यावर कारवाई केली. या कारवाईत आयशर टेम्पोसह लाकडी कोळसा असा एकूण 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती वाईचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश झांजुर्णे यांनी दिली.
दि. 27 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वाई वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी वाई शहरात गस्त घालत होते. त्यावेळी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास वाईतील रविवार पेठेत आयशर टेम्पो आढळून आला. अधिकाऱ्यांनी वाहनाची तपासणी केली असता वाहनात लाकडी कोळसा आढळून आला. टेम्पोचालक आरोपी सुधीर सुरेश मोरे (रा. कऱहावागज ता. बारामती जि. पुणे) याच्याकडे विचारणा केली असता तो लाकडी कोळसा मालाचे वाहतूकीसाठी वाहतूक पास नसताना वाहतूक करत होता. त्याच्यावर वनगुन्हा नोंद केला असून टेम्पोसह लाकडी कोळसा जप्त करण्यात आला आहे.









