कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱयांना शिकविला धडा
प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊन पुकारल्यानंतरही विनामास्क आणि नाहक घराबाहेर घोळका करून थांबणाऱया तरुणांना पोलिसांनी चांगलाच हिसका दाखविला आहे. विनामास्क दुचाकी घेऊन फिरणाऱयांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची वाहनेही जप्त केली आहेत. यामुळे वडगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून साऱयांची चांगलीच धावाधाव झाली आहे.
वडगाव परिसरात 10 नंतरही बेजबाबदारपणे अनेक जण घराबाहेर फिरत होते. याचबरोबर घरासमोर घोळका करून थांबले होते. अचानक पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि नियमांचे उल्लंघन करणाऱयांना चांगलाच हिसका दाखविला आहे. क्लोजडाऊननंतर लॉकडाऊन करण्यात आले आहे. तरीदेखील जनतेमध्ये कोणतेच गांभीर्य नसल्याचे दिसून आले.
वडगाव, येळ्ळूर रोड, आनंदनगर, बाजार गल्ली यासह इतर परिसरात राजरोसपणे काही व्यवसाय सुरू होते. त्याचबरोबर अनेक जण बेजबाबदारपणे घराबाहेर फिरताना दिसत होते. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अचानक त्या ठिकाणी धाव घेतली. दुचाकीवरून मास्क नसताना जणाऱयांना ताब्यात घेऊन चांगलाच प्रसादही दिला. एकूणच पोलिसांच्या या कारवाईमुळे वडगाव परिसरात खळबळ उडाली होती.









