प्रतिनिधी / बेंगळूर
खासगी शाळांमध्ये विनाअनुदान तत्त्वावर सेवा बजावणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आर्थिक संकटात असून त्यांना आर्थिक पॅकेज घोषित करावे, अशी विनंती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी केली आहे. यासंबंधीचे निवेदन त्यांनी बुधवारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना दिले.
बुधवारी सकाळी शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी शिक्षक, पदवीधर मतदारसंघातील आमदारांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी खासगी शाळांमधील शिक्षकांची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे. अनेक शिक्षक फळे, भाजीविक्री करून उदरनिर्वाह करीत आहेत. आपल्या मुलांचे भविष्य घडविणाऱया या समुदायाकडे सन्मानाने बघण्याची गरज आहे. सरकारच्या वतीने त्यांना आर्थिक पॅकेज देऊन आत्मविश्वास निर्माण करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
याप्रसंगी विधानपरिषद सदस्य डॉ. वाय. ए. नारायणस्वामी, पुट्टण्णा, अरुण शहापूर, शशील नमोशी, एस. व्ही. संकनूर, हनुमंत निराणी आणि चिदानंदगौडा आदी उपस्थित होते.









