ऑनलाईन टीम / पुणे :
समाजात विधायक कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचे राष्ट्रसेवेसाठी संघटन निर्माण करावे. समाजात पर्यावरण, पाणी, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण समस्यांचे निवारण करावे. त्याचप्रमाणे नैतिक मूल्यांचे जतन व्हावे यासाठी सामाजिक संस्थांनी संघटीत सेवा कार्य करावे, असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री. श्री. रविशंकर यांनी केले.
महा एनजीओ फेडरेशनतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात केलेल्या सेवाकार्य वृत्तांताचे प्रकाशन रविशंकर यांच्या हस्ते त्यांच्या बंगळुरु येथील आश्रमात झाले. यावेळी फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, सहसंस्थापक विजय वरुडकर, संचालक मुकुंद शिंदे, गणेश बाकले, अक्षयमहाराज भोसले, शशांक ओंबासे, उल्का मोकासदार, प्रशांत वर्मा, डॉ. पूनम राउत, प्रफुल्ल हारफळे, ज्योत्स्ना वरुडकर आदी उपस्थित होते. महा एनजीओ फेडरेशन तर्फे सामाजिक पर्यटन विषयातील बंगळुरु आश्रम ही प्रथम भेट होती.
शेखर मुंदडा म्हणाले, संपूर्ण जग कोरोनाग्रस्त असताना प्रशासन, डॉक्टर, पोलीस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांनी देखील अनेक सेवा उपक्रम राबविले. महा एनजीओ फेडरेशनतर्फे व आर्ट ऑफ लिव्हिंग, आय.ए.एच.व्ही, माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ आणि इतर 200 पेक्षा अधिक स्वयंसेवी संस्थांच्या सहयोगाने 3 लाख पेक्षा अधिक नागरिकांना मदत देण्यात आली.








