प्रतिनिधी/ मडगाव
दहा दिवसांचे विधानसभा अधिवेशन केवळ तीन दिवसांवर आणून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून होत असला, तरी आम्ही म्हादई, कोळसा, खासगी वन, खाण, सीझेडएमए यासारख्या विषयांवरून सरकारला धारेवर धरणार असल्याचे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.
फातोर्डा येथील पक्षाच्या कार्यालयातून जारी केलेल्या व्हिडीओतून आमदार सरदेसाई यांनी विरोधी गट सरकारला वरील प्रश्नांवर धारेवर धरून जाब विचारणार असून गोमंतकीयाच्या हिताचे नसलेले प्रकल्प राज्यात राबविण्यास कडाडून विरोध करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सत्ताधाऱयांनी विरोधक काय म्हणतात ते ऐकून घेणे तसेच विरोधी गटाला आपली बाजू मांडण्यास देणे हे लोकशाही पद्धतीचे मूळ सूत्र आहे. मात्र 3 दिवसांचे विधानसभा अधिवेशन घेऊन विरोधकांची संधी हिरावून लोकशाहीची हत्या सध्या सरकार करत आहे. मात्र आम्ही असलेली संधी सोडणार नसून राज्याला भेडसावणाऱया सर्व विषयांवर आवाज उठविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
म्हादई नदी कर्नाटकाला विकल्यात जमा आहे. खासगी वन घोटाळे करण्यात आले आहेत. शेतकऱयांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. बेकायदा ख?ाण उद्योग सुरू आहे. तसेच कोळसा व सीझेडएमए या विषयांवर गोमंतकीयांचे व राज्याचे हित जपले जात नाही. या सर्व प्रश्नांवरून तीन दिवस सरकारला धारेवर धरून जाब विचारला जाईल, असे सरदेसाई यांनी सांगितले आहे.









