सत्ताधारी पक्षाला विविध विषयांवर कोंडीत पकडण्यासाठी विरोधी पक्षांची तयारी
प्रतिनिधी/ बेंगळूर
आजपासून सुरू होणाऱया विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला विविध विषयावर कोंडीत पकडण्यासाठी विरोधी पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. अधिवेशनात मांडल्या जाणाऱया लव्ह जिहाद, गोहत्या बंदी कायद्यावर आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता असून विधान परिषदेच्या सभापतींविरुद्ध अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. तर विरोधी पक्षांच्या प्रश्नावर समर्थकपणे उत्तरे देण्यासाठी सत्ताधारी भाजप पक्षाने रणनिती आखली आहे.
या अधिवेशनात मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारने लव्ह जिहाद, गोहत्या बंदी कायदा लागू करण्यासह 10 विधेयके मांडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, गोहत्या आणि लव्ह जिहाद कायद्यांना काँग्रेसने विरोध व्यक्त केला आहे. त्यामुळे अधिवेशनात गोंधळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईमधील अपयश, केंद्राकडून निधी मंजूर करण्याबाबत भेदभाव, शेतकऱयांच्या समस्या, कोरोना नियंत्रणात सरकारचे अपयश, मंत्रिमंडळ विस्ताराच्या गोंधळामुळे प्रशासनावर झालेला परिणाम, नेतृत्त्व बदलण्याची चर्चा, भाजपधील सध्याच्या राजकीय घडामोडींचा मुद्दा उपस्थित करून सरकारला धारेवर धरण्यासाठी काँग्रेसने तयारी केली आहे.
अधिवेशनात मांडणाऱया मुद्दय़ांवर आणि त्यावर रुपरेषा आखण्याबाबत विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदारांची बैठक झाली आहे. त्यामुळे या अधिवेशनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच विरोधी पक्षाच्या मुद्दय़ांवर विचार करून समर्थपणे प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपनेही स्वतःची रणनिती आखली असून आकडेवारी पुढे ठेवून विरोधी पक्षाला शांत करण्यासाठी भाजपने तयारी केली आहे. तसेच अधिवेशनात एकत्रित येऊन विरोधकांच्या प्रश्नांवर उत्तरे देण्याचा संदेश भाजपने यापूर्वीच आमदारांना पाठविला आहे.
हिवाळी अधिवेशन बेळगावमधील सुवर्णसौधमध्ये घेतले जात होते. गेल्यावर्षीही बेळगाव जिल्हय़ात पूरस्थिती निर्माण झाल्याने मदत कार्यात अडथळा निर्माण होत असल्याचे कारण देत सरकारने हिवाळी अधिवेशन बेंगळुरात चालविले होते. यावेळेस कोरोनाचे कारण समोर ठेवून बेंगळुरातच अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे पावसाळी अधिवेशन पूर्ण प्रमाणात घेणे शक्य झाले नव्हते. काही आमदार आणि अधिकाऱयांना कोरोनाची बाधा झाल्याने तीनच दिवसात पावसाळी अधिवेशन आटोपण्यात आले होते. त्यामुळे या अधिवेशनात कोरोना नियमांचे पालन करीत आवश्यक खबरदारी घेऊन अधिवेशन घेण्यात येणार आहे.
नूतन सभापतींची नेमणूक होण्याची शक्यता
उद्यापासून सुरू होणाऱया अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या सत्रासह विविध विषयांवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. 15 डिसेंबरपर्यंत होणाऱया या अधिवेशनात शेवटच्या दोन दिवशी एक राष्ट्र एक निवडणूक या विषयावर चर्चा केली जाणार आहे. विधानपरिषदेचे सध्याचे सभापती के. प्रतापचंद्र शेट्टी हे काँग्रेसचे आहेत. त्यामुळे निजदच्या मदतीने त्यांच्याजागी भाजपचा सभापती नेमण्याचा पुढाकार भाजपने घेतला आहे. त्यामुळे या अधिवेशनात विधानपरिषदेसाठी नूतन सभापतींची नेमणूक होण्याची शक्यता आहे.
पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री गैरहजर राहणार?
हिवाळी अधिवेशन आजपासून सुरूवात होत आहे. मात्र, पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा अधिवेशनात गैरहजर राहण्याची दाट शक्यता आहे. सोमवारी सकाळी ते 11.45 वाजता शिमोगा दौऱयावर जात असून दुपारी 3.45 वाजता परत येणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.









