
काँग्रेसची भारत जोडो यात्रा राज्यात येणार असून त्याकरीता कार्यकर्ते जमवण्याची लगबग पक्षामध्ये वाढली असून प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार व सिद्धरामय्या यांच्यातला कलगीतुराही रंगत आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते येडियुराप्पा यांच्यावर एफआयआर दाखल झाल्याचे कारण पुढे करुन माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील यांनी त्यांचा राजीनामा मागितला आहे. एकंदर पाहता दोन्ही पक्षामध्ये अंतर्गत मतभेद उफाळून येत आहेत. आगामी निवडणुकीच्या निमित्ताने तयार होणारे वातावरण हे काहीसे गढूळता निर्माण करणारे नक्कीच आहे.
काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी कन्याकुमारीहून सुरू केलेली ‘भारत जोडो’ यात्रा या महिनाअखेरपर्यंत कर्नाटकात पोहोचणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निघालेली ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी बैठकांचा सपाटाच लावला आहे. काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघातून किमान 5 हजार कार्यकर्ते या यात्रेत सहभागी होतील, अशी व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी आपल्या आमदारांना केली आहे. या सूचनेवरून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. खासकरून माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, दिनेश गुंडूराव आदींनी 5 हजार कार्यकर्ते आणायचे कोठून? असा प्रश्न उपस्थित केला आहे. ‘भारत जोडो’ यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, तर तुम्हाला उमेदवारी द्यायची की नाही? याचा विचार करू, असा इशाराही डी. के. शिवकुमार यांनी दिला आहे. यावरूनही काँग्रेस नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.
खरेतर आजवर झालेल्या वेगवेगळय़ा सर्वेक्षणात कर्नाटकात काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याइतके बहुमत मिळण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळेच भाजपने आपली व्यूहरचना बदलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कर्नाटक दौरे वाढविण्याचे ठरविण्यात आले. ‘भारत जोडो’ यात्रा सध्या कार्यक्रमानुसार 30 सप्टेंबर रोजी कर्नाटकात प्रवेश करणार आहे. 21 दिवसात 511 किलोमीटरचे अंतर कापून शेवटी बळ्ळारी येथे जाहीर सभा आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. यासाठी 1 लाखाहून अधिक कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचा निर्णयही पक्षाने घेतला आहे. मात्र, डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या गटातील सुंदोपसुंदीमुळे ‘भारत जोडो’ यात्रेच्या आधी ‘काँग्रेस जोडो’ म्हणण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे. अमृत महोत्सवी वाढदिवसानंतर सिद्धरामय्या यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता ‘भारत जोडो’ यात्रेनंतर राज्यातील सर्व 224 मतदारसंघात निवडणूक बसयात्रा काढण्याची तयारी त्यांनी केली आहे.
बसयात्रेसाठी हायटेक बस तयार केली जात आहे. उत्तर कर्नाटकात भाजपचा पाया मजबूत आहे. त्यामुळे भाजप नेत्यांचे लक्ष दक्षिणेवर केंद्रित झाले आहे. सिद्धरामय्या यांनी तर निवडणुका जाहीर होण्याआधी सर्व 224 मतदारसंघांचा दौरा करण्याचे ठरविले आहे. यासाठी विद्यमान आमदार व इच्छुकांचा त्यांच्यावर दबाव सुरू आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते गुजरातबरोबर डिसेंबरअखेरपर्यंत कर्नाटकातही निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे सर्व पक्षियांनी त्याची तयारी सुरू केली आहे. भाजपला सत्तेवरून हटवून कर्नाटकातील सत्ता काबीज करण्याचे मनसुबे रचणाऱया काँग्रेस नेत्यांमधील मतभेद आणि मनभेद कमी होण्याचे नाव घेत नाहीत. याला कारण पुढचा मुख्यमंत्री कोण? याविषयी अधूनमधून रंगणारी चर्चा हेच आहे. भाजप सरकारचे भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आणून त्यांच्यापेक्षा काँग्रेसची राजवट कशी चांगली होती? हे नागरिकांना पटवून द्या, असा सल्ला हायकमांडने राज्यातील नेत्यांना दिला आहे. भाजप नेत्यांचा सल्लाही हाच आहे. केंद्र व राज्यात एकाच पक्षाचे सरकार अस्तित्वात असेल तर डबल इंजीन सरकारने विकासकामे मोठय़ा प्रमाणात राबविली जातात, हे मतदारांना पटवून द्या, असा सल्ला भाजप नेत्यांनी राज्यातील नेत्यांना दिला आहे. नेहमीप्रमाणे आगामी निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी हेच भाजपचे भांडवल असणार आहे. त्यामुळेच पंतप्रधानांचे दौरे वाढतील, याची काळजी घेतली जात आहे. यंदाच्या म्हैसूर दसऱयाला पंतप्रधान येण्याची शक्मयता आहे.
कर्नाटकातील बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना पक्षाच्या संसदीय मंडळात स्थान दिले गेले. मात्र, गेल्या आठवडय़ात येडियुराप्पा, त्यांचे चिरंजीव बी. वाय. विजयेंद्र, सहकारमंत्री एस. टी. सोमशेखर यांच्यासह नऊ जणांविरुद्ध लोकायुक्त पोलिसांनी एफआयआर दाखल केले आहे. येडियुराप्पा यांच्या कुटुंबियांचाही यामध्ये समावेश आहे. पूर्वीप्रमाणेच येडिंवर दाखल झालेला हा गुन्हाही खोटा आहे. त्यामुळे या आरोपातून ते निर्दोष मुक्त होतील, असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी आदी नेत्यांनी बोलून दाखविला आहे. माजी केंद्रीयमंत्री व भाजपचे फायरब्रँड नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी मात्र एफआयआर दाखल झाल्यामुळे येडियुराप्पा यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे जशी सिद्धरामय्यांविरुद्ध डी. के. शिवकुमार असा पक्षांतर्गत संघर्ष रंगला आहे तशीच परिस्थिती भाजपमध्येही आहे, हे दिसून येते.
येडियुराप्पा आणि त्यांच्या कुटुंबियांवर यापूर्वीही भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे दाखल झाली आहेत. आता लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाच्या आदेशावरून लोकायुक्त पोलिसांनी एफआयआर दाखल झाल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ही प्रक्रिया पुढे चालणार आहे. निवडणुकीपर्यंत कर्नाटकातील भ्रष्टाचाराची प्रकरणे आणि मुद्दे कसे उचल खातील, हे पहावे लागणार आहे. खरेतर 8 जुलै 2021 रोजी विशेष न्यायालयाने हे प्रकरण रद्दबातल ठरविले होते. मात्र, अर्जदार अब्राहम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे पुन्हा या प्रकरणाला तोंड फुटले आहे. सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनातही भ्रष्टाचाराचे मुद्दे उपस्थित होत आहेत.
कर्नाटकातील कंत्राटदार संघटनेने केलेल्या 40 टक्के कमिशनच्या आरोपांसंबंधी अद्याप गांभीर्याने चौकशी सुरू झालेली नाही. मात्र, कर्नाटका शेजारच्या तेलंगणामध्ये यासंबंधीचे पोस्टर झळकले आहेत. कर्नाटकातील भाजपच्या राजवटीत 40 टक्के कमिशन मागितले जात आहे, अशा आशयाचे पोस्टर दिसून येत आहेत. स्वतः कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी या गोष्टीचा उल्लेख करून त्यावर हरकत घेतली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. आर. यांनी भाजप विरुद्ध विरोधकांची मोट बांधण्याचे काम हाती घेतले आहे. गेल्या आठवडय़ात माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. दसऱयापर्यंत नव्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा करण्याची शक्मयता आहे. कर्नाटकातील कथित भ्रष्टाचाराच्यासंदर्भातील पोस्टर लावणाऱया तेलंगणात भ्रष्टाचारच नाही का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वीपासून महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळबरोबर सीमा व पाणीप्रश्नी कर्नाटकाचे वादंग आहेत. आता तेलंगणाबरोबरही सीमेचा वाद सुरू झाला आहे. यात्रा, जत्रा, टक्केवारीचे आरोप यामुळे सहा महिने आधीपासूनच कर्नाटकाचे रण तापत आहे.








