अध्यक्ष निवडीनंतरच कामकाजाला होणार प्रारंभ
मुंबई
महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन शनिवार दि. 2 जुलै रोजी होणार होते. परंतु आता त्यात बदल करण्यात आला असून रविवार 3 जुलै आणि सोमवार 4 जुलै रोजी हे विशेष अधिवेशन होणार आहे. विशेष म्हणजे अध्यक्षांची निवड करूनच नवीन सरकारच्या कामकाजाला प्रारंभ होणार आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याची मुदत शनिवार 2 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. तर, विधानसभा अध्यक्षपदाची निवड रविवार 3 रोजी होणार आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याने एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपच्या साहाय्याने सरकार बनवले आहे. स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असून त्यांनी प्रथम विधानसभेसाठी अध्यक्ष निवडण्याची घोषणा केली आहे. महाविकास आघाडी सरकारची दोन अधिवेशने अध्यक्षांशिवाय झाली होती. त्यातही उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात शिवसेनेच्या शिंदे गटाकडून अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अध्यक्ष वा उपाध्यक्षांशिवाय अधिवेशन होणार कसे? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शनिवार 2 जुलै रोजी होणारे अधिवेशन पुढे ढकलून ते रविवार 3 आणि सोमवार 4 जुलै रोजी होणार आहे. अर्थात 3 जुलै रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यानंतर 4 जुलै रोजी सरकार विश्वास दर्शक ठराव सिद्ध करण्याची शक्यता आहे.
अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर
विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राधाकृष्ण विखे -पाटील यांचे नाव पुढे आले होते. पण आयत्यावेळी ते नाव मागे घेण्यात आले. त्यांच्याऐवजी राहुल नार्वेकर यांनी भाजपच्यावतीने अर्ज दाखल केला. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा अनुभव लक्षात घेता त्यांच्यासारखा राजकारणात मुरलेला माणूस मंत्रिपदी असावा, असे ठरल्याने त्यांचे नाव अध्यक्षपदाच्या चर्चेतून मागे पडले. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून दीपक केसरकर यांचे नाव चर्चेत आहे. मात्र राहुल नार्वेकर यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार हे निश्चित आहे.