फडणवीस आणि राज्यपालांचे संगनमत
प्रतिनिधी / कोल्हापूर
विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांसाठी महाविकास आघाडीकडून 12 नावे पाठवली जाणार आहेत. पण ही नावे बाजूला ठेवण्याचा निर्णय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. सदरची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वत: मातृशोक झालेले आमदार विनय कोरे यांच्या घरी सांत्वनासाठी गेल्यानंतर सांगितली आहे. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी सर्व माहिती ऐकली आहे. भाजपकडून राज्यपालांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या प्रत्येक निर्णयाला आडकाठी घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गौप्यस्फोट ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.
शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, आमदार विनय कोरे यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने सांत्वनासाठी वारणा येथे कोरे यांच्या घरी गेले होते. ते पोहोचल्यानंतर तेथे काहीच वेळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांत्वनासाठी आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीकडून पाठवली जाणारी बारा नावे बाजूला काढण्याबाबत देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांचे ठरले आहे, असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे भाजपचे हे धोरण चुकीचे आहे.
वास्तविक मंत्रीमंडळाच्या मंजुरीने राज्यपालांकडे पाठवलेला एखादा प्रस्ताव त्यांनी मंजूर करणे अपेक्षीत आहे. पण भाजपच्या सांगण्यावरून राज्यपाल महाविकास आघाडीच्या प्रत्येक निर्णयात खोडा घालत आहेत. अद्यादेश परत पाठवले जात असून महत्वाच्या बिलांवर सह्या केल्या जात नाहीत. ही गंभीर आणि दुर्देवी बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना सांगणार असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. भाजपच्या नेतेमंडळीकडून राज्यपालांना अडचणीत आणले जात असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.
शरद पवार महाविकास आघाडीचे मार्गदर्शक
शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार चालवण्याचे कंत्राट घेतल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पण पवार हे देशातील एक जाणते नेते असून महाविकास आघाडीचे ते मार्गदर्शक आहेत. वेळोवेळी आम्ही त्यांचा सल्ला घेत असतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देखील पवार राज्यातील अनेक प्रश्नांबाबत त्यांची भेट घेऊन चर्चा करत होते. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी चुकीचे वक्तव्य करू नये असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले. भाजपकडून महाविकास आघाडीला जितके अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाईल तितकी आमची आघाडी भक्कम होईल असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.