सांगली : प्रतिनिधी
धावत्या जगामध्ये समाजामधील विधवा, निराधार, परित्यक्ता ज्येष्ठ महिलांमध्ये ऊर्जा व नवचेतना निर्माण करण्यासाठी ब्रह्मनाळ येथील जनक्रांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने अनोखा हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला.
हळदी कुंकवाचा व खेळ गीतांचा नवोपक्रम घेऊन अनेक वंचीत महिलांना संक्रातीचे वाण देऊन एक नवोत्कर्षाचा पायंडा पाडला. चार फेब्रुवारी रोजी जनक्रांती बहुउद्देशी सेवाभावी संस्थेच्या वतीने ब्रम्हनाळ येथिल बिरोबा मंदिरामध्ये हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये जुन्या रूढी परंपरा जुगारून विधवा परित्यक्ता महिलांना देखील हळदी कुंकू आणि वाण देण्यात आले. यावेळी महिलांसाठी वेगवेगळे खेळ घेण्यात आले. वृद्ध महिलांनीसुद्धा अगदी हसत-खेळत उस्फुर्तपणे या खेळांमध्ये सहभाग नोंदवला. त्याचबरोबर उखण्याची स्पर्धा घेण्यात आली. यात महिलांचा सहभाग वाखाणण्यासारखा होता.
फक्त चूल आणि मूल व चार भिंतीच्या आत राहणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या हक्काचं एक व्यासपीठ मिळावं, त्या महिलांच्या अंगभूत कला गुणांना वाव मिळावा व समाजातील रूढी परंपराचं ओझं घेऊन फिरणाऱ्या समाजातील या वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. याचे आयोजन व प्रास्ताविक अध्यक्षा माया गडदे-पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन अंजना कोळेकर यांनी केले. कार्याध्यक्ष आकाश पाटील यांनी आभार मानले. यावेळी किशोरी गुरव, सुरेखा लोटे, लता गायकवाड, जयश्री हाबगुंडे, सुनिता गडदे, वर्षा गडदे यांनी नियोजन केले