प्रतिनिधी / कोल्हापूर
विद्युत ठेकेदारीचा परवाना देण्यासाठी 13 हजाराची लाच मागणाऱया विद्युत निरीक्षक कार्यालयातील शिपायास लाचलुचपत विभागाने सोमवारी सायंकाळी जेरबंद केले. अरविंद मधुकर लबदे (वय 39 रा. माने कॉलनी, तामगांव, ता. करवीर) असे त्याचे नांव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भवानी मंडप येथील पागा इमारतीमध्ये विद्युत निरीक्षक कार्यालय आहे. या कार्यालयात तक्रारदाराने पत्नीच्या नावे महावितरण कंपनीच्या विविध कामांचा परवाना मिळण्यासाठी 2019 मध्ये अर्ज केला होता. एक वर्ष पाठपुरावा करुन अद्याप वीज ठेकेदारी परवाना तक्रारदारास देण्यात आला नाही. यामुळे तक्रारदाराने वारंवार या कार्यालयाशी संपर्क साधून पाठपुरावा केला. सोमवारी सकाळी तक्रारदार या कार्यालयात आला. त्याने कार्यालयातील शिपाई अरविंद लबदे यांना याबाबत विचारणा केली. यावेळी लबदे याने आपण मुंबईला जाणार असून तुम्हाला परवाना मिळवून देतो मात्र यासाठी 13 हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली. या बाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दिली. त्यानुसार सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भवानी मंडप येथील विद्युत निरीक्षक कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून 13 हजार रुपयांची लाच स्वीकारताना कार्यालयातील शिपाई अरविंद लबदे याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. यावेळी कार्यालयामध्येच ही कारवाई झाल्याने कार्यालयात गोंधळ निर्माण झाला होता.
पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, संजीव बंबर्गेकर, शरद पोरे, कृष्णात पाटील, मयुर देसाई, रुपेश माने, यांनी ही कारवाई केली.









