हिंडलगा येथील प्रकार : रस्त्याशेजारी लोखंडी सळी रोवल्याने आणि साईडपट्टय़ांची माती हटविण्यात आल्याने धोका

प्रतिनिधी / बेळगाव
ग्रामीण भागातील रहिवाशांना सुरळीत विद्युतपुरवठा करण्यासाठी हिंडलगा फॉरेस्ट नाका परिसरात विद्युतपुरवठा उपकेंद्र उभारण्यात आले आहे. मात्र केंद्राची उभारणी करताना बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याशेजारील काही भाग खोदण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्याशेजारी निर्माण झालेला खड्डा आणि त्याठिकाणी उघडय़ावर ठेवण्यात आलेली लोखंडी सळी वाहनधारकांसाठी जीवघेणी बनली आहे. याकडे हेस्कॉमचे अधिकारी लक्ष देतील का? अशी विचारणा करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील रहिवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने चांगली पावले उचलण्यात आली आहेत. पण चांगल्या सुविधा उपलब्ध करताना गैरसोयी निर्माण करण्यात आल्याने वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. अनावधानाने वाहन रस्त्याखाली गेल्यास जीव गमावण्याची वेळ आली आहे. हेस्कॉमने विद्युत पुरवठा उपकेंद्र निर्माण केले असून, उपकेंद्राची उभारणी करताना उपकेंद्राकडे जाण्यासाठी प्रवेशद्वार बनविण्यात आले. याकरिता रस्ता करताना बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याशेजारी खोदाई करण्यात आली आहे. यादरम्यान रस्त्याशेजारी साईड पट्टीची माती हटवून दीड फूट खोल खोदण्यात आले आहे. प्रवेशद्वाराचे बांधकाम करताना रस्त्यालगत लोखंडी सळी लावण्यात आली आहे. प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाले. उपकेंद्राची चाचणी करून सुरू करण्यात आले. मात्र, अद्यापही लोखंडी सळी ‘जैसे थे’च आहे. तसेच बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याशेजारच्या साईडपट्टीवर माती घालण्यात आली नसल्याने खोदाई केलेला रस्ता धोकादायक बनला
आहे.
कंत्राटदार-हेस्कॉम अधिकाऱयांचा कानाडोळा
या ठिकाणी चढती असून रस्त्यावर वळण असल्याने वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. तसेच या परिसरात हॉटेल असल्याने रस्त्याशेजारी वाहने पार्क करण्यात येतात. पण रस्त्याशेजारील खड्डा आणि लोखंडी सळी रात्रीच्यावेळी अंधारात लक्षात येत नाही. त्यामुळे वाहनांचे अपघात घडत आहेत. एकाबाजूला वाहनांची गर्दी अशातच खोदलेला रस्ता यामुळे वाहनधारकांसाठी धोकादायक बनले आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत हेस्कॉमच्या अधिकाऱयांकडे तसेच कंत्राटदाराला सूचना करून रस्त्याशेजारी माती घालून लोखंडी सळी हटविण्याची सूचना केली. पण, याकडे कंत्राटदार आणि हेस्कॉमच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केला आहे. त्यामुळे सदर रस्ता वाहनधारकांसाठी जीवघेणा बनला आहे.
अनर्थ घडण्यापूर्वी लक्ष्ला द्या
विशेषतः दुचाकी वाहनधारकांना खुपच अडचणीचे ठरत असून याठिकाणी अवजड वाहन रस्त्यावरून खाली गेल्यास प्रवेशद्वाराचे नुकसान होण्याची शक्मयता आहे. वाहन उपकेंद्रात घुसण्याचा धोका आहे. रस्त्याशेजारी माती घालून साईडपट्टी व्यवस्थित करण्यात यावी तसेच लोखंडी सळी काढण्याची मागणी होत आहे. अनर्थ घडण्यापूर्वी कंत्राटदार व अधिकारी याकडे लक्ष देतील का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.









