राज्य सरकारचा आदेश : कोरोनामुळे सुरक्षेच्या दृष्टिने घेतला निर्णय
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील शाळा-महाविद्यालये केव्हा सुरू होतील?, अशी चर्चा सुरू असतानाच राज्य सरकारने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अभ्यासविषयक मार्गदर्शनासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत शाळांना भेटी देता येणार नाही, असे सरकारने आदेशात स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारने कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागातील नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 21 सप्टेंबरपासून शाळा-महाविद्यालयाना भेटी देता येईल. तसेच अभ्यास, अभ्यासपूरक उपक्रमासंदर्भात शिक्षकांची भेट घेऊन मार्गदर्शन घेता येईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, कर्नाटकात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने राज्य सरकारने सप्टेंबर अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांमध्ये येण्यास परवानगी दिली नव्हती. आता त्यामध्ये 15 दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना 15 ऑक्टोबपर्यंत अभ्यासविषयक मार्गदर्शन घेण्यासाठी शाळांमध्ये येऊन शिक्षकांची भेट घेता येणार नाही.
कोरोना परिस्थितीमुळे राज्यात ऑनलाईन शिक्षण, विद्यागम कार्यक्रमांतर्गत शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून शैक्षणिक उपक्रम, अभ्यासपूरक मार्गदर्शन करण्याची सूचना दिली होती. सध्या ऑनलाईन अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून शिक्षण देण्याचा पर्यायही अवलंबिला जात आहे. मात्र, नियमित अभ्यासक्रम शिकविण्यास अद्याप सुरूवात झालेली नाही. परिस्थितीचा विचार करून 15 ऑक्टोबरनंतर शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना येण्यास परवानगी द्यावी का, याबाबत नंतर निर्णय घेण्यात येईल, असे राज्य सरकारने सांगितले आहे. कोरोना परिस्थितीमुळे पालकांमधील भीती अद्याप कमी झालेली नाही. शिवाय शाळा सुरू केल्यास मुलांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे राज्य सरकारने शाळा-महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही.









