कोरोनाने प्रत्येकालाच खूप काही शिकविले. आता 2021 ची पहाट सर्वांसाठी आशादायक चित्र घेऊन उगवेल, अशी आशा करूया.
2020 ला निरोप देत 2021 चे स्वागत करताना गेल्या वर्षभरात जगाबरोबरच कर्नाटकातील जनतेने कोरोनामुळे सोसलेला मानसिक आणि शारीरिक कोंडमारा प्रत्येकाला प्रकर्षाने आठवतो आहे. संपूर्ण वर्ष शंका-कुशंकांच्या सावटाखाली वाया गेले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन, सीलडाऊन आदींमुळे उद्योगधंदे मेटाकुटीस आले. सामान्य कामगारांपासून उद्योजकांपर्यंतचे सर्वांचेच आर्थिक गणित कोलमडले. कोरोनामुळे अनेक दिग्गजांचा मृत्यू झाला. कामगार, कष्टकरी वर्गाप्रमाणेच विद्यार्थ्यांचेही मोठय़ा प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले. वर्षभर घरी बसूनच ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांना अभ्यास करावा लागत आहे. कोरोनाने प्रत्येकालाच खूप काही शिकविले. आता 2021 ची पहाट सर्वांसाठी आशादायक चित्र घेऊन उगवेल, अशी आशा करूया.
कर्नाटकात कोरोना महामारीचा फैलाव आटोक्मयात आला असला तरी ब्रिटनमधील सुधारित अवताराचे रुग्ण आढळून आल्याने पुन्हा धास्ती वाढली आहे. गुरुवारी दुपारपर्यंतच्या माहितीनुसार कर्नाटकात या नव्या स्वरुपाचे सात रुग्ण आहेत. त्यामुळे थर्टीफर्स्टच्या पाटर्य़ांवर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. राजधानी बेंगळूर येथे तर अनेक ठिकाणी रस्तेच बंद करण्यात आले आहेत. सार्वजनिकरित्या होणाऱया जल्लोषावर कोरोनामुळे सरकारी बंदी आली आहे. कोरोनाच्या नव्या अवताराला घाबरण्याची गरज नाही, केवळ खबरदारी घ्या असा सल्ला तज्ञांनी दिला असला तरी त्याचा फैलाव झपाटय़ाने होतो, याची धास्ती प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात थर्टीफर्स्टसाठी मार्गसूची जारी करण्यात आली आहे. ग्रा.पं. निवडणूक निकाल जाहीर झाला आहे. अपेक्षेप्रमाणे अधिकाधिक ग्रा.पं.वर भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी झाले आहेत. त्यापाठोपाठ काँग्रेसनेही या निवडणुकीत बऱयापैकी कामगिरी बजावली आहे.
1 जानेवारीपासून दहावी-बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार हे गेले दोन दिवस वेगवेगळय़ा शाळा-कॉलेजना भेटी देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करत आहेत. ब्रिटनमधील कोरोनाच्या सुधारित अवताराची धास्ती बाळगू नका. आता शाळा-कॉलेज सुरू करूया, या मतावर सरकार ठाम असले तरी विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेला येण्यापूर्वी कोरोनाची चाचणी करून घेणे सक्तीचे केले आहे. दहावी-बारावीचे विद्यार्थी व शिक्षकांची एकाच वेळी चाचणी करण्यासाठी आवश्यक यंत्रणा सरकारकडे नाही. त्यामुळे ही व्यवस्थाच कोलमडली आहे. खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी किमान 3,000 रु. मोजावे लागतात. सरकारी इस्पितळात ही चाचणी मोफत होते, मात्र सकाळपासूनच मोठय़ा रांगेत उभे रहावे लागते. प्रत्येक जिल्हा केंद्रावर विद्यार्थी व शिक्षकांच्या रांगा लागल्या आहेत. दहावी-बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर कोणत्या परिणामांना सामोरे जावे लागणार हे जानेवारीच्या दुसऱया पंधरवडय़ात स्पष्ट होणार आहे.
2020 ने अनेक धक्के दिले आहेत. विधान परिषदेचे उपसभापती एस. एल. धर्मेगौडा (वय 65) यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेले दोन पानी मृत्यूपत्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 15 डिसेंबर रोजी विधान परिषदेत मोठा राडा झाला. देशातील संसदीय लोकशाही व्यवस्थेने शरमेने मान खाली घालावी, असा हा प्रकार होता. विधान परिषदेत झालेल्या धक्काबुक्कीच्या अपमानातून धर्मेगौडा यांनी आत्महत्या केली आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. या मुद्दय़ावरूनही कर्नाटकात सध्या राजकीय नाटय़ रंगले आहे. खरेतर सभापती प्रतापचंद्र शेट्टी यांच्यावर भाजपला अविश्वासाचा ठराव मांडायचा होता. निजदच्या मदतीने काँग्रेसचे प्रतापचंद्र शेट्टी सभापती झाले आहेत. बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे निजदने आपला पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळेच त्यांनी राजीनामा द्यावा, अशी अपेक्षा होती. प्रतापचंद्र शेट्टी यांनी राजीनाम्याची तयारी दर्शविली होती. मात्र, निधर्मीपणाचा डंका पिटताना भाजपला मदत करणाऱया निजदला उघडे पाडण्यासाठी जे व्हायचे आहे ते सभागृहात होऊ द्या, तुम्ही राजीनामा देऊ नका, असा सल्ला माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिल्यामुळे त्यांनी राजीनामा सादर केला नाही. त्यानंतर 15 डिसेंबरचे नाटय़ घडले. राज्यपालांच्या सूचनेवरून त्या दिवशीचे अधिवेशन भरले होते. धक्काबुक्कीत धर्मेगौडा खाली कोसळले होते. साऱया देशाने हा राडा पाहिला होता.
धर्मेगौडा यांची आत्महत्या नसून राजकीय व्यवस्थेने केलेला खून आहे, अशी तिखट प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी व्यक्त केली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही त्यांच्या आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. सरकारने धर्मेगौडा यांनी लिहिलेल्या मृत्यूपत्रात काय आहे, हे जाहीर करण्याची मागणी अनेक नेत्यांनी केली आहे. हे आत्महत्या प्रकरण केवळ कर्नाटकात नव्हे तर संपूर्ण देशभरात ठळक चर्चेचा विषय बनले आहे. धर्मेगौडा हे राजकीय व्यवस्थेचे बळी ठरले, ही गोष्ट खरी आहे. विधान परिषदेवर ताबा कोणाचा रहावा, यासाठी सध्या भाजप, काँग्रेस आणि निजद या तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये सत्तासंघर्ष सुरू आहे. आवश्यक संख्याबळ नसतानाही केवळ निजदला उघडे पाडण्यासाठी काँग्रेस राजकीय खेळी खेळते आहे. या खेळीचाच धर्मेगौडा बळी ठरले आहेत. यावरून प्रत्येक राजकारण्याने आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
रमेश हिरेमठ








