मुंबई जीएसटी अधिकारी विनोद देसाई यांचे प्रतिपादन : मराठा संस्कृती संवर्धन संघटनेचा वर्धापन दिन
प्रतिनिधी / बेळगाव
जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत उच्च पदावर काम करण्यासाठी एमपीएससी, युपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा. इतर ठिकाणी वेळ वाया घालविण्यापेक्षा या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केल्यास कमी वयात उच्च पदापर्यंत मजल मारता येते, असे विचार मुंबई जीएसटी विभागाचे उपायुक्त विनोद देसाई यांनी मांडले.
मराठा संस्कृती संवर्धन संघटनेचा सातवा वर्धापन दिन रविवारी महात्मा फुले रोड येथील विजयालक्ष्मी हॉल येथे पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब कदम-पाटील, सेपेटरी किशोर देसाई उपस्थित होते. रावसाहेब देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यवस्थापनाविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. शिवप्रतिमेचे पूजन रावसाहेब देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. ईशस्तवन व स्वागतगीत क्रांती विचारे यांनी म्हटले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार विनोद देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात कोरोना योद्धा म्हणून डॉ. देवदत्त देसाई, गायत्री बुईटे यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, दहावी, बारावी, पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन बापूसाहेब देसाई व श्वेता देसाई यांनी केले. सतीश देसाई यांनी आभार मानले.
सांस्कृतिक कार्यक्रमाने आणली रंगत
अवंती देसाई व तिच्या साथीदारांनी रोमांचित करणारा पोवाडा सादर केला. ‘ही मायभूमी ही जन्मभूमी’ या नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे कार्यक्रमात रंगत आली. अध्यक्ष अनिल पाटील यांनी आभार मानले. यावेळी मराठा संस्कृती संवर्धन संघटनेचे पदाधिकारी व मराठा समाज बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









