प्रतिनिधी /बेळगाव
आजच्या आधुनिक युगात प्रत्येकाला संगणक शिक्षणाची गरज आहे, असे मत जितो बेळगाव विभागाचे अध्यक्ष पुष्पक हणमन्नवर यांनी व्यक्त केले. खानापूर तालुक्मयातील चिकदिनकोप्प गावातील शासकीय शाळा जैन इंटरनॅशनल टेड ऑर्गनायझेशनच्या बेळगाव विभागातर्फे संगणक शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आली असून शाळा दत्तक, संगणक व शिक्षणाची गरज या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
या सरकारी शाळेत इयत्ता 5 वी ते 7 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देण्याची जबाबदारी जितोने घेतली आहे. देणगीदारांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात आला असून आगामी काळात अधिकाधिक सरकारी शाळांमध्ये तो राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जितोचे सदस्य सचिन पाटील, संतोष पोरवाल, हजारे किचनवेअर आणि हेमागिरी क्लॉथसह इतर सदस्यांनी सहकार्य केल्याने हा प्रकल्प यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.
जितो संघटनेचे सचिव अमित दोशी, राहुल हजारे, गुलाबचंद जैन, अभया आदिमनी आणि जितो महिला विभाग अध्यक्षा रूपाली जानाजा आदी उपस्थित होते.









