वार्ताहर/ मौजेदापोली
कोरोनानंतर पहिल्यांदा 9वी ते 12वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत, परंतु शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठवण्यासाठी पालकांना संमती पत्र द्यावे लागणार आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सॅनिटायझर, मास्कची जबाबदारी शिक्षण संस्था व स्थानिक प्रशासनावर देण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
शाळांमध्ये काही वर्ग सुरू होत असले तरी पालकांना संमती पत्र द्यावे लागणार आहे. महाविद्यालयांमध्ये हे संमती पत्र ऑनलाईन विद्यार्थ्यांना पाठवले आहेत ते भरुन देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. सॅनिटायझर, मास्कचा वापर बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची थर्मामीटरद्वारे तपासणी करूनच प्रवेश मिळणार आहे. असे असले तरी किती पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी संमती देतात याकडे शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
9वी ते 12वीपर्यंतचे वर्ग सध्या सुरू होणार आहे इतर वर्गाचा निर्णय अद्याप शासनाकडून शाळांना प्राप्त झालेला नाही. सोमवारी शाळा सुरू झाल्यानंतर किती पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत यायला परवागी दिली आहे व इतर गोष्टींचा पाहणी दौरा केला जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी संतोष भोसले यांनी सांगितले.









