विविध कार्यालये हिरवाईने नटणार : बागायत खात्यामार्फत जिल्हय़ातील 155 शाळांमध्ये रोपांची लागवड करणार
सुनील राजगोळकर / बेळगाव
विद्यार्थ्यांना बालवयातच पर्यावरणातील विविध फळा-फुलांची ओळख व्हावी व शाळेच्या आवारातच विविध पौष्टिक फळे उपलब्ध व्हावीत, याकरिता फलोत्पादन खात्यामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय योजनेंतर्गत जिल्हय़ातील सरकारी शाळांच्या आवारात विविध फळांच्या रोपांची लागवड केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता शाळेतही विविध फळांची चव चाखता येणार आहे. शिवाय शाळांच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. शाळांबरोबर आरोग्य केंद्रे, हॉस्टेल, सरकारी निवासी गृहे यासह जिल्हय़ातील 506 ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात फळरोपांची लागवड होणार आहे. रोप लागवडीचे काम (नरेगा) योजनेतील कामगारांकडून होणार असल्याने कामगारांनाही काम उपलब्ध होणार आहे.
विद्यार्थ्यांना पाठय़क्रम शिकविताना या झाडांचा उपयोग होणार असून त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये वन, जैवविविधता यांचे रक्षण आणि संवर्धन याबाबत आवड निर्माण व्हावी, या हेतूने फलोत्पादन खात्याने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला आहे. आंबा, चिकू, फणस, लिंबू, पेरू, कडीपत्ता, नारळ, जांभूळ, डाळिंब, पपई, सीताफळ, आवळा, शेवग्याच्या शेंगा आदी रोपांचा यामध्ये समावेश आहे. साधारण प्रत्येक शाळेत स्थानिक परिस्थिती पाहून 100 ते 150 रोपे लावण्यात येणार आहेत.
खात्यामार्फत सर्व शाळांबरोबर ग्रामपंचायतींमध्ये पौष्टिक फळरोपांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून जिल्हय़ातील 155 सरकारी शाळेत हा उपक्रम राबविला जाणार आहे. मुलांना विद्यार्थीदशेतच पर्यावरणातील झाडांचे महत्त्व व ओळख निर्माण व्हावी, या उद्देशाने बागायत खात्याने हा उपक्रम राबविला आहे. पहिल्या टप्प्यात 155 ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ही लागवड होणार आहे. दरम्यान, बागायत खात्यामार्फत फळांच्या रोपांचे वितरण होणार असून सध्या प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी ही रोप लागवड करण्यात येत आहे. लवकरच जिल्हय़ातील सरकारी शाळा, हॉस्टेल, निवासी गृहे, अंगणवाडी केंदे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लागवड केली जाणार आहे. दरम्यान स्थानिक हवामान, पाण्याची उपलब्धता आणि भौगोलिक स्थिती पाहून लागवडीला प्राधान्ह दिले जाणार आहे. शिवाय लागवड केलेल्या रोपांच्या देखभालीची जबाबदारी संबंधित संस्थांकडे राहणार आहे.
पावसाचे प्रमाण राखण्याबरोबर जमिनीची धूप, वाढती उष्णता कमी करण्यासाठी वृक्षारोपणाची गरज लक्षात घेऊन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण खात्री योजनेंतर्गत खात्याच्यावतीने रोप लागवडीसाठी दरवषी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. सध्या अवकाळी पाऊस समाधानकारक झाल्याने जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे रोप लागवडीस उपयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे खात्यामार्फत लवकरच रोप लागवडीचे काम हाती घेतले जाणार आहे. रोपांच्या लागवडीसाठी रोहयो कामगारांकडून खड्डे खोदून घेतले जाणार आहेत. त्यामुळे कामगारांनाही स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होणार आहे.
गतवषीपेक्षा यंदा अधिक रोपलागवडीचे उद्दिष्ट
जिल्हय़ातील सरकारी शाळा, हॉस्टेल व इतर ठिकाणी विविध फुला-फळांची रोप लागवड करण्यात येणार आहेत. गतवषीदेखील हा उपक्रम राबविण्यात आला होता. मात्र, गतवषीपेक्षा यंदा अधिक रोपांची लागवड करण्यात येणार आहे. शाळा आवारात रोप लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध फळांचा आस्वाद घेता येणार आहे.
– रविंद्र हाकाटी (उपनिर्देशक, बागायत खाते)








