प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या 3 हजार 420 शाळामधील सुमारे 2 लाख 56 हजार विद्यार्थ्यांना गेल्या 7 महिन्यांचा पोषण आहार एकत्रित वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी तांदळासह कडधान्य व डाळींचेही वाटप दोन टप्प्यात होणार असून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाची कार्यवाही सुरू झाली आहे.
जिल्ह्यात जुलैअखेर शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले होते. शासन नियमानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुदानित शाळांना पोषण आहार वाटप केला जातो. त्यामध्ये जिल्हा परिषद, खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित नगरपालिका अशा सुमारे 3 हजार 420 शाळांचा समावेश आहे. यामध्ये पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्याला प्रतिदिन 100 ग्रॅम, सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्याला प्रतिदिन 150 ग्रॅम तांदूळ मिळणार आहे. याशिवाय पाचवी, सहावी व आठवीच्या विद्यार्थ्यांना कडधान्य व डाळी देण्यात येणार आहेत. पोषण आहाराचे पहिल्या टप्प्यात 80 दिवसाचे तर दुसऱ्या टप्प्यात 54 दिवसांचे वाटप केले जाणार आहे. त्यानुसार शिक्षण विभागामार्फत कार्यवाही सुरू झाली आहे. तसेच संबंधित ठेकेदारामार्फत शाळा स्तरावर शालेय पोषण आहार पोहोच करणाचे काम सुरू झाले आहे. शाळास्तरावरूनही विद्यार्थ्यांना त्याचे वाटप सूरू करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी धनजंय चोपडे यांनी दिली.









