आमदार जयंत आसगावकरांच्या पाठपुराव्याला यश
प्रतिनिधी / वाकरे
एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय रेखाकला परीक्षेचे सवलतीचे अतिरिक्त गुण मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. तसा आदेश आज शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी काढून विद्यार्थ्यांना दिलासा दिला. आमदार जयंत आसगावकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे विद्यार्थ्यांना हे हक्काचे गुण मिळणार आहेत.
सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय रेखाकला परीक्षेचे सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येऊ नये, असा निर्णय शासनस्तरावर झाला होता. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार होते. या सवलतीच्या गुणासाठी आमदार आसगावकर यांनी शासनस्तरावर प्रयत्न करावेत, अशी मागणी कलाध्यापक संघाने निवेदनाद्वारे केली होती.
आमदार आसगावकर यांनी दि.९ जून रोजी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे पत्राद्वारे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना शासकीय रेखाकला परीक्षेचे सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात यावेत, अशी विनंती केली होती. याशिवाय मुंबई येथे मंत्री गायकवाड यांची भेट घेऊन तर अनेक वेळा दूरध्वनीद्वारे चर्चा करून आदेश काढण्याची मागणी केली. अखेर दि.१६ जून रोजी मंत्री गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना शासकीय रेखाकला परीक्षेचे सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतचा नवा शासन आदेश काढला. जे विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा पास झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा गुण देण्यात येणार आहेत. तसेच एटीडी व मुलभूत अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सुध्दा या वर्षांकरिता शिथीलता देण्यात आली आहे. आमदार आसगावकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे कलाध्यापक संघाच्या शिष्ठमंडळाने त्यांचे आभार मानले. या आदेशामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Previous Article”पेट्रोल-डिझेलची शंभरी पार, खाद्य तेल २०० पार..अच्छे दिन आ गये”
Next Article निवृत्त कृषी विस्तार अधिकारी श्रीपाद सोमण यांचे निधन









