कोरोना विषाणूने घातलेल्या धुमाकुळाने भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळवले. मोठमोठे उद्योग थांबले, करोडो डॉलरचे नुकसान झाले. कारखानदारी, संपत्ती आणि मोठय़ा उलाढाली वगैरे सगळ्या गोष्टी क्षणभंगुर आहेत अशी भावना निर्माण झाली. पण एवढे काही होत असताना जगभरातील राजकीय घडामोडी मात्र थांबल्या नाहीत. थायलंड या आग्नेय आशियाई देशातील विद्यार्थी आंदोलनामुळे निर्माण झालेली अशांतता ही अशीच एक न थांबलेली गोष्ट. साधारणपणे या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात कोरोना विषाणूने जगातील निरनिराळ्या देशात हातपाय पसरण्यास सुरुवात केली, आणि मग जनजीवन विस्कळीत झाले ते आजतागायत. परंतु नेमक्या याच कालावधीत थायलंडमधल्या विद्यार्थी आंदोलनाने जोर धरला आणि आता ते अधिक उग्र झाले आहे. त्या देशात परवाच्या गुरुवारी सरकारने निदर्शने आणि जमावाने एकत्र येणे वगैरे गोष्टींवर बंदी घातली. मात्र विशेष असे की अद्याप तेथील संरक्षक यंत्रणांनी गोळीबार वगैरे केल्याचे वृत्त नाही आणि हजारोंच्या संख्येने निदर्शक जमलेले असले तरी कालपर्यंत अवघ्या वीस व्यक्तींना अटक झाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वा. थायलंडमध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीसदृश उपायांचे समर्थन करताना देशात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्याची तातडीची गरज असल्याचे तेथील शासनाने स्पष्ट केले. देशात गोंधळ माजवून संघर्षाला चिथावणी देत सार्वजनिक व्यवस्था बिघडवण्याच्या उद्देशाने निदर्शकांची वाटचाल सुरू आहे असे थायलंडच्या सरकारी टेलिव्हिजन वाहिनीवरून घोषित झाले. बुधवारी त्या देशाच्या राणीसाहेबांच्या शाही मोटारींचा ताफा मिरवणुकीसारख्या ऐटीत रस्त्याने जात असताना काही लोकांनी त्यासमोर केलेली शांततापूर्ण निदर्शने हे शासनाच्या कठोर कारवाईचे तात्कालीन निमित्त ठरले.
ही शांततापूर्ण निदर्शने करणाऱया आंदोलकांनी आपले हात उंचावून तीन बोटे एकत्र आणत ‘त्रिबोटी सलाम’ केला. आपल्याला गंमत वाटेल, आणि ते तर अभिवादन करत आहेत, अशी समजूत होईल अशा या ‘त्रिबोटी सलामा’चा अर्थ आम्ही चळवळ करत आहोत असा होतो, आणि ‘असल्या’ अभिवादनाने राज्यकर्त्यांचे पित्त न खवळले तरच नवल! पोलिसांनी तातडीने धाव घेऊन निदर्शकांना आवरले, पंतप्रधानांच्या कार्यालयासमोर गोळा झालेल्या आंदोलकांनाही मागे हटवले, पुन्हा ते जमू नयेत यासाठी रस्ते रिकामे झाल्यावर शेकडो पोलीस दिसत असल्याची छायाचित्रे जगातील महत्त्चाच्या प्रसारमाध्यमांनी प्रसृत केली. अशा प्रकारचे निर्बंध जारी केले जातात तेव्हा त्यांचा एक डोळा नेहमीच प्रसारमाध्यमांवर असतो. त्यामुळे गडबड टाळण्यासाठी चारपेक्षा जास्त व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर बंदी घालतानाच प्रसारमाध्यमांच्या बातमीदारीवरही बंधने लादण्यात आली. नागरिकांमध्ये घबराट निर्माण होईल, अथवा जाणीवपूर्वक माहितीचा विपर्यास केला जाईल, आणि त्यामुळे राष्ट्रातील शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षा धोक्यात येईल, हे टाळण्यासाठी प्रसारमाध्यमांवर काही बंधने घालण्यात आल्याचे तेथील प्रशासनाने म्हटले आहे.
हे सगळे कशासाठी होत आहे? प्राचीन भारतीय संस्कृती आणि प्राचीन आशियाई वैभवाच्या पाऊलखुणांचे जागोजागी दर्शन घडवणारा, नाजूक बांध्याच्या कमनीय सुंदरीच्या हास्याने उल्हासित राहणारा आणि आशिया-पॅसिफिक विस्तीर्ण क्षेत्रातील व्यापार आणि जहाज वाहतुकीच्या केंद्रस्थानी असलेल्या थायलंड या सुंदर देशात इतकी अशांतता का बरे पसरली?
जगातल्या अन्य शहरांची शोभा स्वच्छ आणि विस्तीर्ण रस्ते आणि त्यावर उभारलेल्या उड्डाणपुलांवरून एकमेकीला छेद देत होत असलेल्या गतिमान वाहतुकीने वाढते, बँकॉक या थायलंडच्या राजधानीत मात्र घरांच्या सुरेख ओळींच्या मधून पायऱयांशी लगट करत जाणाऱया कालव्यांच्या पाण्यावर हेलकावे घेत जाणाऱया विविधरंगी नौकांच्या रहदारीची लगबग शहराचे सौंदर्य खुलवते, आणि अशा सौंदर्याला का बरे ही दृष्ट लागावी?
थायलंडमधील अशांतता ही निखाऱयांवर बसलेल्या राखेच्या थरासारखी आहे. फुंकर मारताच लालबुंद डोळ्यांचे दर्शन घडवत त्या निखाऱयांतून अग्नी डोकावू लागतो तशी परिस्थिती तिथे आहे, आणि अनेक वर्षांपासून तेथील जनतेच्या मनात असंतोषाची खदखद मूळ धरून बसली आहे. थायलंडमधील सत्ता अनेक वर्षे लष्कराच्या हातात राहिली. त्या देशाच्या राज्यव्यवस्थेचे स्वरुप ‘घटनात्मक राजेशाही’ असे आहे आणि राज्यघटना बदलण्यात आल्यावरही तेथील राजघराण्याचे स्थान ‘पूजनीय आणि आदरणीय’ असे असल्याचे घटनेने मान्य केले आहे आणि त्या राजघराण्याच्या विरोधात अवाक्षरही काढणे हा तेथे कित्येक वर्षांच्या तुरुंगवासाचे कारण ठरणारा गुन्हा आहे. यापूर्वी थकसिन शिनावात्रा या अति भ्रष्ट पंतप्रधानाने तेथे बरीच वर्षे सत्ता उपभोगली, त्यानंतर जनतेच्या रेटय़ामुळे त्याला हद्दपार करण्यात आले, तरीही तो बाहेरून सूत्रे हलवत होता आणि त्याची बहीण यिनलुक शिवानात्रा हिने प्रचंड मतांनी विजयी होऊन पुन्हा सत्ता हस्तगत केली. तेथील विद्यमान पंतप्रधानदेखील माजी लष्करप्रमुख आहेत आणि त्यांनीही सत्ता हस्तगत करून आपल्याला अनुकूल ठरतील असे कायदे करून घेतले. 2019 सालात झालेल्या निवडणुकीत हे कायदे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्या विरोधात न्यायालयात दाद मागितली असता नव्यानेच संघटित झालेल्या तरुणांच्या पक्षाचे विसर्जन करावे असा निर्णय न्यायालयाने दिला.
प्रायुथ चॅन-ओचा नावाच्या या पंतप्रधान महाशयांनी राजीनामा द्यावा ही या विद्यार्थी निदर्शकांची महत्त्वाची मागणी आहे. ज्या पक्षाचे विसर्जन करण्याचा सल्ला न्यायालयाने दिला त्यात युवकांचा भरणा अधिक आहे आणि मध्यवर्ती निवडणुकीत ‘फ्युचर फॉरवर्ड पार्टी’ नावाच्या या पक्षाने तिसऱया क्रमांकाचे बहुमत प्राप्त केले आहे.वान-चालिअर्स सत्सक्षित नावाचा युवा नेता 2014 मध्ये कंबोडियामध्ये नाहीसा झाला, त्याचा तपास अद्याप लागलेला नाही. अनोन नाम्या हा छत्तीस वर्षांचा वकील, पारित चिवारक हा विद्यार्थी नेता आणि पानुसाया ही महिला आंदोलक अटकेत आहेत. त्यांना लोकांपासून दूर ठेवल्यावर निदर्शने थंडावतील अशी राज्यकर्त्यांची कल्पना आहे. तरीही राजघराण्याचे महत्त्व कमी करण्यात यावे, राज्यघटना नव्याने लिहावी आणि शासनावर टीका करणाऱयांचा छळवाद थांबवण्यात यावा या मागण्यांसाठी चालवलेल्या आंदोलनाला हजारो विद्यार्थ्यांचा जोरदार पाठिंबा मिळतच आहे.
राजेंद्रप्रसाद मसुरकर, 9960245601








