प्रतिनिधी/ लांजा
शाळेतून घरी परतणाऱया एका अल्पवयीन विद्यार्थिनीला वाटेत अडवून तिच्या हाताला धरुन ओढत नेत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात तालुक्यातील शिपोशी येथील एका 35 वर्षीय तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अल्पवयीन मुलगी एका हायस्कूलमध्ये नववीमध्ये शिकते. ती बुधवार 7 मार्च रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास शाळेतून पायवाटेने घरी परतत असताना शिपोशी सुतारवाडी येथील अरुण दत्ताराम सुतार याने तिच्या उजव्या हाताला धरून तिला वाटेलगतच्या झुडपात नेऊन तिचा विनयभंग केला. हा प्रकार या मुलीने बुधवारी सायंकाळी आपल्या घरातील लोकांना सांगितला. त्यानंतर मुलीचे पालक आणि तालुका विधी समिती सदस्या स्वप्ना सावंत यांनी लांजा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा या बाबत तक्रार दाखल केली होती.
मुलीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनुसार, गुरुवार 18 मार्च रोजी लांजा पोलीस ठाण्यात अरूण दत्ताराम सुतार याच्याविरोधात पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या बाबत अधिक तपास लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील करीत आहेत.









