नरंदे / प्रतिनिधी :
नरंदे तालुका हातकणंगले येथील विद्यामंदिर नरंदेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण इंगवले उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडत असताना नरंदे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये नऊ तुकड्यायांसह 250 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. लवकरच पाचवीसाठी नवीन तुकडीची मान्यता घेण्यात येणार आहे.
या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अनेक सेवा सुविधा उपलब्ध असून शाळेत पहिलीपासून सेमी इंग्लिश, डिजिटल वर्ग, ई -लर्निंग यांसारख्या सुविधा मोफत दिल्या जातात. शाळेमधील अनेक शिक्षकांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. शाळेला आदर्श शाळा पुरस्कारही मिळाला आहे. शाळेमधील बहुसंख्य विद्यार्थी हे जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहेत तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी अव्वल गुण संपादन करीत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.
शाळेमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने प्रतिवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. कार्यक्रमांमध्ये पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. छत्रपती शिवाजीमहाराजांचे पोवाडे, चित्रपटांमधील गाणी, लोकगीते, समाज प्रबोधन पर नाटिका, एकांकिका , कथाकथन यांसारख्या अनेक गाण्यांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. मान्यवरांच्या हस्ते आदर्श विद्यार्थी व आदर्श विद्यार्थिनी या पुरस्काराचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्धाटन जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण इंगवले यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक बबनराव भंडारी उपस्थित होते तसेच सरपंच रवींद्र अनुसे, उपसरपंच अभिजित भंडारी, भूविकास बँकेचे संचालक किरण इंगवले, मुख्याध्यापक सुकुमार पांडव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल चौगुले, उपाध्यक्षा अश्विनी भंडारी, पोलीस पाटील वैभव भंडारी, केंद्र प्रमुख पवार, ग्रामपंचायत सदस्य विनोद भंडारी, संतोष भंडारी, नामदेव पाटील, सिकंदर मुलानी, अर्जुन कांबळे, अर्चना गिड्डे, लक्ष्मीबाई खोत, मीनाताई कांबळे, सदाशिव शेटे, आप्पासो गुरव, रघुनाथ अनुसे, आनंदराव भंडारी, शरद भंडारी, राजू खरोशे, संजय कुंभार, सचिन भंडारी यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच हातकणंगले पंचायत समितीचे उपसभापती राजकुमार भोसले यांनीही कार्यक्रमास सदस्य भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार पांडव यांनी केले तर सूत्रसंचालन अशोक खाडे व आभार शिवाजी इंगळे यांनी मानले.