प्रतिनिधी / पणजी
विद्याभारती, गोवा या शैक्षणिक संघटनेची सर्वसाधारण सभा काल पर्वरी विवेकानंद सभागृहात घेण्यात आली. या सभेत 2020 ते 2023 या तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारी समितीची निवड करण्यात आली. डॉ. सीताराम कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या कार्यकारी समितीवर पुढिलप्रमाणे सदस्यांचा समावेष आहे ः कार्याध्यक्ष- प्राचार्य गजानन ह. मांदेकर, उपाध्यक्ष- प्रा. अनिल सामंत, संघटन मंत्री- पुरुषोत्तम पां. कामत, कार्यवाह- मुख्या. म्हाळसाकांत देशपांडे, सहकार्यवाह- प्रा.मनोहर पेडणेकर, कोषाध्यक्ष- राजेंद्र भोबे, सदस्य – प्रा. ज्ञानेश्वर पुं.पेडणेकर, प्रा.माधव जोशी, मुख्या. शिवाजी पाटिल व प्रा. सुभाष भा. वेलिंगकर. राज्य शिशुवाटिका/शिशुशिक्षण प्रमुख म्हणून ऍड. रोशन अभय सामंत यांची निवड झाली. या सर्व निवडी एकमताने बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी सूर्यकांत ला. गावस यांनी घोषित केले.
सर्वसाधारण सभेचे स्वागत व प्रास्ताविक मावळते अध्यक्ष राजेंद्र भोबे यानी केले. गत 3 वर्षांच्या कार्यकालातील कामांचा व प्रगतीच्या टप्प्यांचा त्यानी आढावा घेतला व नवीन समितीकडून अपेक्षा व्यक्त केल्या. गतवर्षाचा हिशेब व या वर्षाच्या अंदाजपत्रकाचा आराखडा त्यानी सभेत मांडला. सूर्यकांत गावस यांनी निवडणूक अधिकारी व त्याना सहाय्यक म्हणून मुख्या. संदीप पाळणी यांनी जबाबदारी पार पाडली. तत्पूर्वी प्रा. गजानन मांदेकर यानी मागील सभेचे इतिवृत्त वाचले व एकमताने संमत करून घेतले. ऍड. रोशन सामंत यानी शिशुशिक्षणाच्या प्रत्यक्ष कार्याची माहिती दिली.
अन्य इतर विषय सत्रात प्रा. सुभाष भा. वेलिंगकर यानी, सरकारने मातृभाषा माध्यमाच्या,मराठी- कोकणी शाळांना दिले जाणारे विशेष उत्तेजनार्थ ,दर विद्यार्थ्यामागे दरमहा 400 रुपयाचे, लक्ष्मीकांत पार्सेकर सरकारने 2017 साली सुरु केलेले अनुदान , सध्याच्या डॉ.प्रमोद सावंत सरकारने अकस्मात बंद करून मातृभाषा माध्यमाच्या मराठी-कोकणी शाळांवर गंभीर आघात केल्याचे सांगून विद्याभारतीने हे अनुदान चालू करण्यासाठी हिरीरीने प्रयत्न करावे लागतील असे सांगितले. प्रा. मनोहर पेडणेकर यानी आभारप्रदर्शन केल्यावर शांतीमंत्राने सभेची सांगता झाली. सभेचे सूत्रसंचालन मुख्या.म्हाळसाकांत देशपांडे यानी केले.









