362 परीक्षांसाठी 1 लाख 28 हजार विद्यार्थी बसणार
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत ऑक्टोबर-नोव्हेंबर 2021 हिवाळी सत्रातील ऑनलाईन परीक्षांना सोमवार 14 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. या सत्रात 662 परीक्षांसाठी 1 लाख 28 हजार विद्यार्थी बसणार आहेत. पहिल्या दिवशी बीटेक विषयाची परीक्षा होणार असून जवळपास 500 विद्यार्थी बसणार आहेत.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत हिवाळी परीक्षांना सोमवारपासून सुरूवात होत आहे. बी. व्होक, बी. कॉम. बँक मॅनेजमेंट, बी. एस्सी. ऍनिमेशन, बीएस्सी शुगर टेक, बी. एस्सी. बायोटेक, बी. कॉम. बिझनेस मॅनेजमेंट, बीएस्सी बायोटेक, बीएस्सी फुड प्रोसेसिंग अँड मॅनेजमेंट आदी विषयांच्या परीक्षा मंगळवारपासून सुरू होणार आहेत. या परीक्षा 14 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत होतील. परीक्षा देताना विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच ऑनलाईन परीक्षेसाठी तांत्रिक अडचण आल्यास विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील हेल्पलाईन क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे यांनी केले आहे.
महाविद्यालयात क्लस्टर परीक्षा
विद्यापीठ संलग्न महाविद्यालयात बी. ए., बी. कॉम, बी. एस्सी. भाग एकच्या आणि क्लस्टर पध्दतीच्या परीक्षांना सोमवार 14 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. 302 परीक्षांसाठी जवळपास 1 लाख विद्यार्थी बसणार आहेत. यामध्ये एम. बी. ए., लॉ., इंजिनिअरिंग, फार्मसी, एज्युकेशन, आर्किट्रेक्चर या विषयांचा समावेश आहे. या सर्व परीक्षा महाविद्यालय पातळीवर होतील. तसेच या परीक्षांचे सॉफ्टवेअरसुध्दा वेगळे असणार आहे. त्याचा निकाल महाविद्यालयाने विद्यापीठाला कळवायचा आहे.