नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचा विदेश चलन साठा सातत्याने घटत आहे. गेले सहा आठवडे ही घट सुरु आहे. 9 सप्टेंबरला संपलेल्या आठवडय़ात त्यात 17.79 हजार कोटी रुपयांच घट झाली असून आता तो 43.87 लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोहचला आहे. हा गेल्या दोन वर्षांमधील सर्वात खालचा स्तर आहे.
2 सप्टेंबरला संपलेल्या आठवडय़ात तो 63.25 हजार कोटी रुपयांची घट झाली होती. या वर्षीच्या प्रारंभीपासून आतापर्यंत रशिया-युक्रेन युद्धामुळे साठय़ात 6.37 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. तसेच विदेश चलन मालमत्तेतही 19.99 हजार कोटी रुपयाची घट झाली असून आता ही मालमत्ता 38.99 लाख कोटी रुपयांची राहिलेली आहे. मात्र, हा चिंतेवा विषय नाही, असे तज्ञांचे मत आहे.
सोन्याच्या साठय़ात वाढ
विदेशी चलन साठय़ात घट होत असली तरी सोन्याच्या साठय़ात मात्र काही प्रमाणात वाढ झाली आहे. 9 सप्टेंबरला संपलेल्या आठवडय़ात ही वाढ 2.70 हजार कोटी रुपयांची आहे. सध्या सरकारकडे असलेले एकंदर सोन्याचा साठा 3.07 लाख कोटी रुपयांचा आहे. त्या मागच्या आठवडय़ात या साठय़ात 10.66 हजार कोटी रुपयांची घट झाली होती. मात्र, ही घट आता थांबल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रय नाणेनिधीच्या निकषानुसार मारताची आरक्षित स्थिती आता 63 कोटी रुपयांनी वाढून 39.10 हजार कोटी रुपये झाली आहे. मात्र भारताची स्पेशल ड्रॉईंग राईटस् स्थिती 501 कोटी रुपयांनी घटून 1.41 लाख कोटी रुपये इतकी झालेली आहे. रिझर्व्ह बँकेने ही माहिती प्रसिद्ध केली आहे.









