वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या विश्वचषक कनिष्ठांच्या हॉकी स्पर्धेचे यजमानपद भारत भूषवित आहे. सदर स्पर्धा ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान खेळविली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱया विदेशी हॉकी संघांवर क्वारंटाईनची सक्ती राहणार नाही, अशी घोषणा स्पर्धा आयोजकांनी केली आहे.
चालू महिन्याच्या प्रारंभी क्रीडा मंत्रालयाचे संयुक्त सचिव एल. एस. सिंग यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे या आगामी स्पर्धेसाठी विदेशी संघांवर क्वारंटाईनची सक्ती न लादण्याची विनंती केली होती.
सदर स्पर्धा भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान क्वारंटाइनची सक्ती शिथील केली असली तरी कोरोना संदर्भातील काही नियमांची अंमलबजावणी या स्पर्धेवेळी राहील, असे स्पर्धा आयोजकांनी सांगितले. विदेशी संघांचे भारतात आगमन झाल्यानंतर विमानतळावरच संघातील हॉकीपटूंची कोरोना चाचणी घेतली जाईल. त्यानंतर या स्पर्धेत सहभागी होणाऱया सर्व स्पर्धकांच्या आरोग्य स्थितीवर 14 दिवसांच्या कालावधीत निरीक्षण राहील.
प्रकृतीमध्ये काही कोरोना संदर्भातील लक्षणे आढळल्यास त्या खेळाडूंना आयसोलेशनमध्ये रहावे लागेल. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स तसेच सॅनिटायझरचा वापर या स्पर्धेवेळी अनिवार्य असेल. भारतातील क्वारंटाइनच्या सक्तीमुळे इंग्लंड संघाने या स्पर्धेतून यापूर्वीच माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. सहभागी होणाऱया विविध देशांच्या संघातील खेळाडूंना लसीकरण सक्तीचे असेल.









