वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विदेशात शिकत असलेले भारतीय विद्यार्थी जे कोरोना संकटामुळे देशात अडकले आहेत किंवा अन्य कुठल्या समस्येला तोंड देत आहेत, अशा विद्यार्थ्यांना विदेश मंत्रालयाच्या ‘ओआईए-2 डिव्हिजनशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी या विद्यार्थ्यांकरता दोन ईमेल ऍड्रेस प्रसारित केले आहेत.
जगातील अनेक देशांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी होत असलेल्या अडचणींचा पाढा विदेश मंत्रालयासमोर वाचला होता, त्यांनतर हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील लाखो विद्यार्थी विदेशी विद्यापीठांमध्ये शिकत आहेत, पण कोरोनामुळे विमानप्रवास बंद झाल्याने ऑनलाईन शिक्षण घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. यातील बहुतांश विद्यार्थी सध्या भारतातच अडकले आहेत.
कोव्हॅक्सिन किंवा स्पुतनिक-व्ही लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा लस घेण्यास सांगण्यात आल्याचे समजते. कारण जागतिक आरोग्य संघटना किंवा युरोपीय देशांनी अद्याप या दोन्ही लसींना मंजुरी दिलेली नाही.









