केंद्र सरकारने दिली परवानगी- वैयक्तिक वापर करता येणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाच्या दुसऱया लाटेत ऑक्सिजनच्या मागणीत प्रचंड वाढ दिसून आली आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागल आहे. याचदरम्यान सरकारने विदेश व्यापार धोरणात दुरुस्ती करत वैयक्तिक वापरासाठी देखील ऑक्सिजन कंसट्रेटर यंत्र आयात करण्याची अनुमती दिली आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून एका अधिकृत पत्रकाद्वारे याची माहिती देण्यात आली आहे. ऑक्सिजन कंसट्रेटर यंत्राला सूटयुक्त शेणींमध्ये नोंदणीकृत करण्यात आले आहे. यात सीमाशुल्काबाबत एक ‘भेटवस्तू’च्या स्वरुपात नोंद करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या नियमांनुसार या ऑक्सिजन कंसट्रेटर्सना कुठलाही व्यक्ती स्वखर्चावर पोस्ट, कुरियर किंवा ई-कॉमर्स पोर्टल्सच्या माध्यमातून खरेदी करू शकतो. विदेश व्यापार महासंचालनालयाच्या (डीजीएफटी) एका अधिसूचनेनुसार ही सूट 31 जुलै 2021 पर्यंत कायम राहणार आहे.









