गोव्यात आणणे बनले महत्त्वाचे : कुटूंबियांनी घेतली विरोधी पक्षनेत्यांची भेट
प्रतिनिधी / मडगाव
गोव्यात चांगली नोकरी मिळणे कठीण, त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी विदेशात जहाजावर नोकरीसाठी गेलेले सुमारे सात ते आठ हजार गोमंतकीय खलाशी प्रचंड संकटात सापडले आहेत. समुद्रात जहाजावर अडकून पडले असून त्यांना परत आणावे यासाठी त्यांचे नातेवाईक जोरदार प्रयत्न करीत आहेत. सध्या त्यांना कुठल्याच बंदरात उतरण्याची मान्यता दिली जात नाही. तसेच जहाजांचे मालक व एजंट देखील मदत करीत नाही. त्याचबरोबर वैद्यकीय सुविधाही उपलब्ध होत नाही.
कुटुंबीय तणावाखाली
सध्या गोव्यात कोरोना व्हायरस पूर्णपणे नियंत्रणात आहे. मात्र, या सात ते आठ हजार खलाशांना परत आणल्यास येथील परिस्थिती नियंत्रणात रहाणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यांना परत आणणे भावनिक मुद्दा बनला आहे. या खलाशांना परत आणल्यास त्यांना कुठे ठेवावे हा गंभीर प्रश्न सरकार समोर आहे. त्यांच्यासाठी एखादे स्टेडियमच वापरात आणावे लागणार आहे. काही जणांना कोरोना व्हायरसची बाधा झाल्याने, पूर्ण दक्षता घ्यावी लागणार आहे. सध्या त्यांचे कुटूंबिय तणावाखाली असून त्यांना परत आणल्याशिवाय पर्याय देखील शिल्लक राहिलेला नाही. हे खलाशी इटली, स्पेन, अमेरिका इत्यादी देशांनी अडकलेले आहेत.
खलाशांच्या आरोग्याचा प्रश्न
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील सर्व देशात आणीबाणीची परिस्थीती उद्भवल्याने, समुद्रातील प्रुझ जहाजांना बंदरात प्रवेश नाकारण्याचे धोरण अनेक देशानी अवलंबिल्याने, या जहाजांवर काम करणाऱया व गोमंतकीय खलाशांची परिस्थिती एकदम वाईट झाली आहे. जहाजांचे मालक व एजंटाकडून खलाशांना कोणतीच मदत उपलब्ध केली जात नाही. वैद्यकीय मदतसुद्धा मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
कुटूंबियांनी घेतली विरोधी पक्षनेत्यांची भेट
काल सोमवारी या खलाशांच्या कुटूंबियांनी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची भेट घेऊन खलाशांना तातडीने मदत मिळवून देण्याची विनंती केली. त्यानंतर या गंभीर प्रश्नावर श्री. कामत यांनी केंद्रीय आयुषमंत्री व गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक तसेच अनिवासी भारतीय आयोगाचे आयुक्त नरेंद्र सावईकर व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे संपर्क साधून त्यांना परत गोव्यात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना आखण्याची विनंती केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज व्हिडीयो कॉन्फरन्सद्वारे मंत्रिमंडळ बैठक होणार असून त्यावेळी हा विषय उपस्थित करण्याची मागणी श्री. कामत यांनी आयुषमंत्र्याकडे केली आहे.
सरकारने या सर्व खलाशांचा ठावठिकाणा शोधून काढून तसेच ते सध्या कुठे व कोणत्या परिस्थीतीत आहेत याची माहिती त्यांच्या कुटूंबियाना देणे अत्यंत गरजेचे आहे असे विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले आहे.
जहाजावरील खलाशांनी गोव्याची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी खुप मोठे योगदान दिले आहे. विदेशी चलन मिळवून देण्यातही त्यांची मदत सरकारला होते. आज त्यांच्यावर संकट आले असताना त्याना गरजेच्यावेळी मदत पोचवणे तसेच त्यांच्या कुटूंबियांना दिलासा देणे हे सरकारचे कर्तव्य आहे, असे श्री. कामत यांनी म्हटले आहे.