पालकवर्ग चिंतातूर : सरकारने त्वरित लक्ष घालण्याची मागणी
प्रतिनिधी / पणजी
विदेशात अडकलेल्या खलाशांना आणण्याच्या प्रश्नावरून सध्या सरकारवर प्रचंड दबाव वाढत असतानाच आता जगभरातील अनेक देशात अडकलेल्या शेकडो विद्यार्थ्यांचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. या विद्यार्थ्यांच्या पालकांना सध्या चिंतेने ग्रासले असून विद्यार्थ्यांना घरी परतण्याची ओढ लागली आहे.
लॉकडाऊनमुळे गोव्यात अडकलेल्या जर्मनी, जपान, रशिया, लंडन, अमेरिका, झेकोस्लाविया, आदी विविध देशातील सुमारे 5900 नागरिकांना मायदेशी पाठविण्यात आले आहे. लॉकडाऊन असतानाही त्यांच्यासाठी सुमारे 32 खास विमानांची व्यवस्था करण्यात आली. हाच नियम विविध देशात अडकलेल्या आपल्या नागरिकांसाठी गोवा सरकारला लावता आला असता. तसे झाले असते तर ज्या ज्या देशात ही विमाने गेली त्यांच्या परतीच्या प्रवासात त्या संबंधित देशात असलेल्या भारतीय वा गोमंतकीय नागरिकांना आणि खास करून विद्यार्थ्यांना आणता आले असते. परंतु सरकारने हा विषय म्हणावा तेवढा गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. परिणामी आता हे विद्यार्थी वारंवार पालकांकडे संपर्क करून एकदाचे आपल्याला घरी आणा, अशी आर्जवे करू लागले आहेत. त्यामुळे पालकांची चिंता दिवसेदिवस अधिकच वाढू लागली आहे.
साडेसात लाख भारतीय विद्यार्थी विदेशांत
विदेश व्यवहार मंत्रालयातील आकडेवारीनुसार सुमारे 7.50 लाख भारतीय विद्यार्थी जगभरातील विविध देशात शिक्षण घेत आहेत. त्यात प्रामुख्याने अमेरिका, न्युझिलँड, पॅनडा, फ्रान्स, जर्मनी, चीन, सिंगापूर, आयरलँड, युएई, युके, ऑस्ट्रेलिया, इटली, रशिया, अशा सुमारे 90 देशांचा समावेश आहे. यातील सर्वाधिक म्हणजे जवळजवळ 52 टक्के विद्यार्थी एकटय़ा अमेरिकेत शिक्षण घेतात. तेथे प्रामुख्याने हॉर्वर्ड, एमआयटी, प्राईसटन अँड स्टॅनफोर्ड, यासारखी जगातील सर्वोत्तम आणि सर्वात मोठी अशी काही विद्यापीठे आहेत. पॅनडामध्ये सुमारे 1.25 लाख, साऊदी अरेबियात 70 हजार, युएईत 50 हजार, ऑस्ट्रेलियात 87 हजार, न्युझिलँडमध्ये 30 हजार, युके 16500, जर्मनीत सुमारे 10 हजार एवढे भारतीय विद्यार्थी आहेत.
ज्या चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना महामारीने संपूर्ण जगाला आपल्या राक्षसी विळख्यात घेतले आहे, तेथेही उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात भारतीय विद्यार्थी जात होते. इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱया तेथील विविध महाविद्यालये आणि दर्जेदार विद्यापीठातून सुमारे 15 हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.त्या शिवाय रशिया, सिंगापूर, आयरलँड, युएई, आदी देशांतही प्रत्येकी सरासरी 1500 ते 2000 भारतीय विद्यार्थी दरवर्षी शिक्षणासाठी जात असतात.
सरकारी कर्जाद्वारे शिकणारे विद्यार्थीही विदेशात
उच्च शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज घेतलेले अनेक विद्यार्थीही विदेशात शिकत आहेत. त्यांच्यावर सरकारने लाखो रुपये गुंतविलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे. अन्यथा हे बिनव्याजी कर्ज मुद्दलासह बुडीत खात्यात जाण्याची भीती आहे. अशावेळी सरकारने या विद्यार्थ्यांसह अन्य सर्व विद्यार्थ्यांच्याही हिताचा विचार करून त्वरित निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
दरम्यान, या प्रकरणी त्वरित लक्ष घालून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी रशियातील एका महाविद्यालयात शिकणाऱया दक्षिण गोव्यातील विद्यार्थ्याच्या पालकाने व्यक्त केली आहे.









