कंपन्या असोत की व्यक्ती असोत वित्तीय नियोजन हे महत्त्वाचे. वित्तीय नियोजनाचा विचार करताना आपण आपली मराठी म्हण ‘अंथरुण बघून पाय पसरावे’ ही लक्षात घ्यावी. सध्याच्या सतत दबाव आणणाऱया ‘मार्केटिंग’च्या जमान्यात आपल्याला सर्व माध्यमांवर पैसे उडविण्याच्या जाहिरातीच जास्त दिसतात. यांचाही परिणाम मानवी मनांवर होतो.
बजेट
प्रत्येकाने मासिक व वार्षिक अशी दोन बजेट तयार करावयासच हवीत. आपले उत्पन्न किती? संभाव्य खर्च किती व शिल्लक किती? या बजेटला अनुसरून जर आर्थिक व्यवहार केले तर आर्थिक गाडा बऱयाप्रकारे चालू शकेल. लॉकडाऊन असल्यामुळे जनतेच्या अनावश्यक खर्चावर बराच आळा बसला आहे. उद्या कोरोना गेल्यावरही ही आर्थिक शिस्त पाळणे नक्कीच वाईट नाही.
विम्याचे नियोजन
भारतीयांच्या बाबतीत केलेल्या अभ्यासात अशी माहिती समजली आहे की भारतीय लोकांचे जीवन विमा उतरविताना योग्य नियोजन नसते. सुरक्षिततेच्या दृष्टीने जीवन विम्याचे संरक्षण हवे. पण प्रत्येक व्यक्तीने त्याच्या गरजेनुसार विमा पॉलिसीची निवड करावयास हवी. ती केली जात नाही. जीवन विमा व्यवहारांत ‘मिस सेलिंग’ (गरज नसलेली पॉलिसी विकत घेणे) फार मोठय़ा प्रमाणावर होतो. विमा एजंट व्यक्ती त्यांना चढय़ा दराने कमिशन मिळेल अशाच पॉलिसी गिऱहाईकांना उतरायला आग्रह करतात व त्यांच्या आग्रहाला बळी पडून बऱयाच विमाधारकांकडे त्यांना गरज नसलेल्या नको त्या पॉलिसी असतात. एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवावी की गुंतवणूक म्हणून विमा पॉलिसीत गुंतवणूक करू नये. कुठल्याही विमा पॉलिसीत कधीही विमाधारकाला 6 टक्क्मयांहून अधिक परतावा मिळत नाही. याहून अधिक परतावा मिळणारे व सुरक्षित असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. साधारणपणे उत्पन्नाच्या दहापट रकमेचा विमा उतरवावा. समजा, एखाद्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपये असेल तर त्याने 50 लाख रुपयांचा विमा उतरवावा. आरोग्य विमा मात्र जितक्मया जास्तीत जास्त रकमेचा उतरविता येईल तेवढा उतरवावा. कारण भविष्यात कोणाच्या शरीरात काय बदल घडू शकतील याचा कोणालाच अंदाज नसतो आणि दुर्दैवाने भारतात आरोग्य क्षेत्राच्या नाडय़ा प्रामुख्याने खासगी आस्थापनांच्या हातात असल्यामुळे व वैद्यकीय खर्चात सातत्याने वाढ होत असल्यामुळे आरोग्य विमा मात्र जास्तीत जास्त रकमेचा घेणे चांगले. जीवन विम्याचा पुरेशा व योग्य रकमेचा टर्म प्लान विकत घ्यावा. हा आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने योग्य निर्णय ठरू शकतो.
अडचणीच्या वेळेसाठी तयार नसणे
कोणाच्या आयुष्यात कधी अडचणीची वेळ येईल हे सांगता येत नाही. प्रत्येकच्या आयुष्यात चढउतार असतातच. अशावेळी पैशाची गरज लागू शकते. बऱयाच जणांची यासाठी तरतूद नसतेच, हे पूर्णतः चुकीचे आहे. प्रत्येकाकडे आणीबाणीच्या परिस्थितीत पुढील दोन महिन्यांचा खर्च करता येईल इतक्मया रकमेची तरतूद हवी. जर अशी तरतूद नसेल तर त्यांना चढय़ा दराने कर्ज घ्यावे लागते व त्यामुळे ती व्यक्ती कर्जाच्या सापळय़ात अडकली जाते किंवा गुंतवणुकीतून बाहेर पडावे लागते व ज्या भविष्यातील उद्देशाने गुंतवणूक केलेली असेल ते उद्देश सफल होतीलच याची खात्री उरत नाही. अगोदरच गुंतवणूक तज्ञांचे असे म्हणणे होते, की सहा महिन्यांचा खर्च चालू शकेल, इतकी रक्कम सहज पैसे मिळणाऱया गुंतवणूक पर्यायांत गुंतवावी.
गुंतवणूक
भारतीयांना बचत करायला आवडते. पण बचत करणे व गुंतवणूक करणे या दोन वेगळय़ा बाबी आहेत. आयुष्यात शक्मय असेल तितक्मया लवकर गुंतवणुकीस सुरुवात करावी. कित्येक व्यक्ती 40 वर्षांनंतर गुंतवणुकीचा विचार करतात. हा आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने चुकीचा निर्णय असतो. जेवढी तुमची गुंतवणूक जास्त तेवढे तुमचे म्हातारपण सुखकारक! निदान आर्थिकदृष्टय़ा शारीरिकदृष्टय़ा हा वेगळा भाग. कोणाच्या तरी सांगण्यावरून गुंतवणूक करू नका. गुंतवणूक करताना तुम्ही ज्या योजनेत गुंतवणूक करीत आहात त्या योजनेची संपूर्ण माहिती करून घ्या व ही गुंतवणूक करणे तुम्हाला गरजेचे आहे काय? लाभदायक आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाल्यानंतरच गुंतवणूक करा. तुमच्या कमी कालावधीच्या व दीर्घ कालावधीच्या गरजा लक्षात घेऊन गुंतवणूक करा.
म्युच्युअल फंड
लोकांची हल्ली म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याकडे पावले वळू लागली आहेत. विशेषतः सिस्टीमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लान्स (एसआयपी) मध्ये गुंतवणूक वाढत चालली आहे. याबाबतही म्युच्युअल फंड कंपन्या तुमचा पैसा कोणत्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतविणार आहेत, त्याची माहिती करून घ्या. गरज पडलीच तर या विषयातील तज्ञांचे मत विचारा. bit.ly/2CAhpg97 या वेबसाईटवर 50 चांगल्या म्युच्युअल फंडांची माहिती आहे. गुंतवणूक करताना ‘नॉमिनेशन’चा तक्ता नक्की भरावा. फार मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक असल्यास मृत्यूपत्र/इच्छापत्रही करावे. नाहीतर गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारसांना बऱयाच अडचणींना तोंड द्यावे लागते.
योग्य गुंतवणूक करा. गरज आहे त्या पर्यायातच गुंतवणूक करा. गुंतवणुकीचे कायद्याने ठरविलेले सर्व सोपस्कार पूर्ण करा. यशस्वी गुंतवणूकदार व्हा! मनस्ताप झालेले गुंतवणुकदार होऊ नका. मनस्ताप व्हावा म्हणून मुद्दाम कोणी चुकीची गुंतवणूक करीत नाही. पण गुंतवणूक करतेवेळी योग्य काळजी न घेण्याने मनस्ताप होऊ शकतो! कधी कधी प्रारब्धाचाही भाग असतो. उदाहरण द्यायचे तर पीएमसी बँकेचे ग्राहक, सिटी को-ऑप. बँकेचे ग्राहक व अन्य काही बँकांचे ग्राहक. बँक सुस्थितीत असताना त्यांनी गुंतवणूक केली असणार, पण त्यांना कोठे माहीत असते की या बँकांचे संचालक ‘फ्रॉड माईंडेड’ आहेत. याला गुंतवणूकदारांनी आपले प्रारब्ध समजायचे, पण प्रारब्ध म्हणून सोडूनही द्यायचे नाही. योग्य काळजी घ्यायची, दक्षता बाळगायची.
– शशांक मो. गुळगुळे









