ऑनलाईन टीम / आळंदी :
विठ्ठलाच्या, माऊलींच्या आणि तुकोबांच्या दर्शनासाठी कोणाचीही परवानगी घ्यावी लागत नाही. आणि तसं कोणाला वाटत असेल आणि कुणी परवानगी नाकारत असेल तर त्यांना वारकरी संप्रदायाचा विचारच समजला नाही. तो सच्चा वारकरी नाही असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वारकरी परिषदेमध्ये लगावला.
शरद पवार हे हिंदूविरोधी आहेत. ते नेहमी हिंदू धर्माला विरोध करतात. ते रामायणाला विरोध करतात. पवार नास्तिक मंडळींना पाठिंबा देतात. त्यामुळेच त्यांना यापुढे वारकऱयांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलवण्यात येऊ नये, अशा आशयाचे पत्रक वारकरी परिषदेकडून जारी करण्यात आले होते.
शरद पवार म्हणाले, सच्चा वारकरी अशी भूमिका कधी घेणार नाही. मी फारसा लक्ष देत नाही. लहान सहान गोष्टी होतात. त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे असते.
पुढे ते म्हणाले, आज मी आळंदीमध्ये आलो आहे, मनामध्ये कुठला हेतू ठेऊन आलो नाही. पंढरपूर, देहू, आळंदीला, तुळजापूर आणि शेगावला जात असतो. माझा या सर्व ठिकाणी जाण्याचा हेतू हा प्रदर्शन करण्याचा नसतो. राजकारणामध्ये आम्ही आहोत याचा अर्थ अखंड प्रसिद्धीशिवाय आमच्याकडे दुसरे काही नसते, असा गैरसमज आहे. त्या मार्गाला मला जायचं नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.