तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भगीरथ भारत भालके यांची बिनविरोध निवड सोमवारी झाली. आ. भारत भालके यांच्या निधनानंतर चेअरमनपदाची निवड प्रक्रिया पार पडली.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी कुणाची वर्णी लागणार ? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. प्रारंभी पासूनच भगिरथ भालके यांनीच चेअरमन व्हावे. अशी शेतकरी सभासदातून चर्चा होती. यामध्येच कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय औदुंबर आण्णा पाटील यांचे नातू युवराज पाटील हे चेअरमन पदासाठी इच्छुक होते. मात्र विठ्ठल परिवारातील नेते असणारे कल्याणराव काळे , युवराज पाटील व तसेच अन्य नेत्यांनी संचालक मंडळाशी चर्चा केली. यातून चेअरमन पदासाठी भगीरथ भालके यांचे नाव पुढे आले. आणि त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पंढरपूरच्या इतिहासात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असणारा व्यक्ती विधानसभा निवडणुकीचा उमेदवार समजला जातो. त्यामुळे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आपसूकच भगीरथ भालके यांच्या नावावरच आगामी काळात शिक्कामोर्तब होईल. हे देखील या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.









