डिचोली / प्रतिनिधी
“जय शिवाजी, जय भवानी” या जयघोषाने अवघ्या वातावरणात चैतन्य आणणाऱ्य घोषणेची प्रेरणा घेत विठ्ठलापूर साखळी येथील श्री देवी भवानीच्या चरणापाशी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थानापन्न करण्यात आला असून त्याचे अनावरण रवि. दि. 27 फेब्रु. रोजी संध्या. 4.30 वा. होणार आहे. विठ्ठलापूर साखळी येथील “जय शिवाजी जय भवानी ग्रुप”तर्फे हि संकल्पना सत्यात उतरविण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा बसविण्यात आलेला असून परिसराला किल्ल्याचे स्वरूप देऊन सुशोभीकरण करण्यात आले आहे.
विठ्ठलापूर साखळी येथील पराग पित्रे व सचिन पित्रे यांच्या घरासमोरील खुल्या जागेत सदर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि सुशोभीकरण होत असून त्यासाठी पराग व सचिन पित्रे यांनी जागा दिली आहे. या जागेच्या एका तोकावर केवळ वर्षभरापूर्वी भगवा झेंडा फडकविण्यात आला होता. त्यानंतर सदर जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची संकल्पना उज्वल उर्फ उमेश हळर्णकर यांना सुचली. भवानी देवीचे मंदिर.या विठ्ठलापूरात असून त्यांच्या चरणी त्यांचे निस्सीम भक्त शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहू शकतो, अशी भावना उज्वल हळर्णकर यांनी इतरांकडे मांडली. त्यासाठी सर्वप्रथम पाच जणांची त्याच ठिकाणी एक चर्चा.बैठक घेण्यात आली.आणि सर्वांंनीच हि संकल्पना उचलून धरली आणि सर्वजण कामालाही लागले.
या कामासाठी अनेक दात्यांनी विविध स्वरूपात आर्थिक व इतर प्रकारचे सहकार्य केले. सर्वप्रथम पुतळय़ाचा चौथरा साकारण्यासाठी दर्शनी भागात काँक्रीटचा खांब उभारण्यात आला. परंतु त्याला काहींनी आक्षेप घेतल्याने तो बऱयाच उंचीवर पोहोचूनही हटवावा लागला. त्यामुळे मोठा खर्च वाया गेला. या आक्षेप सत्रामुळे सदर खांब मागील बाजूस नेण्यात आला. आणि त्याचे कामही सुरू झाले.
या कामाला प्रारंभ केल्यानंतर पुतळय़ासाठी खांब व बसका तसेच सभोवतालीच्या परिसराचे सुशोभीकरण या कामाला वेळ लागल्याने या पुतळय़ाचे अनावरण लांबत गेले. शिवाजी महाराजांचा पुतळा खास पंढरपूर येथून आणण्यात आला. भवानी देवीचे मंदिर असल्याने सिंहासनारूढ पुतळा बसविण्याचे ठरविण्यात आले आणि त्याच पध्दतीचा पुतळा आणला गेला. पुतळा चौथऱयावर स्थानापन्नही करण्यात आला. परंतु इतर काम रखडल्याने गेल्या शिवजयंतीदिनी या पुतळय़ाचे अनावरण होऊ शकले नाही.
अनेकांनी केले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य
उज्वल उर्फ उमेश हळर्णकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणाऱया या पुतळय़ासाठी आतापर्यंत करण्यात आलेल्या कामासाठी तसेच सुशोभीकरण व इतर कार्यात संदीप नाईक, प्रथमेश चोडणकर, शैलेश फातर्फेकर, तिर्थराज पुजारी, श्रीरंग आमोणकर, विशाल भोसले, उमेश उसपकर, मुन्ना देसाई, अरूण काशिनाथ नाईक, गुलशन सावंत, शिवानंद बापे, व्यास जावडेकर, कृष्णा बांदेकर व इतरांनी बरेच परिश्रम घेत सहकार्य केले. तसेच अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आर्थिक सहाय्य या कामासाठी केले.
सर्वांच्या सहकार्याने छत्रपतींचा पुतळा उभारण्याचे स्वप्न साकार
विठ्ठलापूर येथे वर्षभर विविध कार्यक्रम सुरूच असतात. त्या कार्यक्रमांमध्ये आता आणखीन एका कार्यक्रमाची भर पडली आहे. या भागातील युवा तसेच सर्व शिवप्रेमींना एकत्रित आणून संघटीत करण्याच्या दृष्टीने हि संकल्पना हाती घेण्यात आली. त्यास पित्रे यांच्यासह अनेकांनी हातभार लावला आणि हे स्वप्न पूर्ण झाले. या महाराजांच्या पुतळय़ामुळे या भागाला वेगळाच साज निर्माण झाला असून सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने या परिसराला शोभा आलेली आहे, असे उज्वल हळर्णकर यांनी सांगितले.
रविवारी भव्य ढोल पथक मिरवणूक आणि पुतळय़ाचे अनावरण.
या महाराजांच्या पुतळय़ाचे अनावरण रवि. दि. 27 फेब्रु. रोजी संध्या. 4.30 वा. होणार आहे. या सोहळय़ास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माजी मुख्यमंत्री तथा पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे, मयेचे भ जप उमेदवार प्रेमेंद्र शेट व इतरांची उपस्थिती लाभणार.आहे. तत्पूर्वी 3 वा. कारापूर तिस्क येथून ढोल ताशे पथकाची मिरवणूक निघणार आहे. सदर मिरवणूक कारापूर तिस्क येथून काजू कारखान्याच्या रस्त्यावरून नवीन पुल, साखळी बाजार, दत्तवाडी, पुलावरून विठ्ठलापूर येथे दाखल होणार आहे. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुतळय़ाचे अनावरण होणार आहे. या सोहळय़ात मोठय़ा संख्येने शिवप्रेमी आणि शिवभक्तांनी उपस्थिती लावावी, असे आवाहन जय शिवजी जय भवनी ग्रुपतर्फे करण्यात आली आहे.









